Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
RSS Reshimbagh Memorial Temple : अजित पवारांनी संघाच्या बौद्धिक वर्गाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचा आमदार संघाच्या मुख्यालयात दाखल झाला आहे.
नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान (Maharashtra Assembly Winter Session 2024) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) दरवर्षी भाजपच्या (BJP) आमदारांसाठी संघाच्या मुख्यालयात बौद्धिकाचे आयोजन केले जाते. यावेळी आमदार संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतात. तसेच संघाचे पदाधिकारी आमदारांना संघाच्या कार्याची माहिती देऊन बौद्धिक मार्गदर्शनही करतात. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार दाखल झाले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार बौद्धिकाला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अजित पवार रेशीमबागेत येण्याची शक्यता धूसर झाली आहे. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) हे रेशीमबागेत दाखल झाले आहेत.
राजू कारेमोरे संघाच्या मुख्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी तुम्हाला पक्षाकडून इथे येण्याबाबत सांगण्यात आले का? असे विचारले असता मी या ठिकाणी स्वयंप्रेरणेने आलो आहे. पक्षाकडून या ठिकाणी जायचं आहे, अशी कुठलीही सूचना नाही, असे त्यांनी म्हटले. भाजपच्या प्रतोदांकडून सगळ्या मित्रपक्षांनी आज संघ मुख्यालयात यावे, असे संदेश देण्यात आला होता. याबाबत विचारले असता असे मी पण ऐकले. त्यामुळेच मी येथे असल्याचे त्यांनी म्हटले. अजित पवार येथे येणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, दादा येतील माझी दादांसोबत चर्चा झालेली नाही. मी त्यांना आता भेटलेलो नाही. मात्र येथे यायला अडचण काय? इतर आमदार येतील की नाही हे मला नसल्याचे राजू कारेमोरे यावेळी म्हणाले.
अजित पवारांची बौद्धिक वर्गाकडे पाठ
दरम्यान, अजित पवार आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या बौद्धिक वर्गासाठी उपस्थित राहतील का? अशी चर्चा होती. मात्र अजित पवारांनी या बौद्धिक वर्गाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आज सकाळपासूनच अजित पवारांनी येणाऱ्या विजिटर्सला भेटण्याची वेळ दिलेली आहे. आज सकाळपासून अजित पवारांना भेटण्यासाठी माजी आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजीव नवघरे, यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल हे नागपूरमधील विजयगड निवासस्थानी भेटण्यासाठी आल्याचे पाहायला मिळाले.
संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संघाच्या मुख्यालयात दाखल झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, रेशीमबागेत मी पहिल्यांदा आलो नाही, यापूर्वी देखील आलेलो आहे. संघ परिवाराचे माझे लहानपणापासून संबंध आहे. संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली आहे. नंतर मी शिवसेनेच्या शाखेत गेल्यानंतर बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचारांची शिकवण घेतली. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम केले पाहिजे हे संघ परिवाराकडून शिकावे. कुठलीही प्रसिद्धीची भावना ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करत असतो. देशभरात संघाच्या पाच लाख शाखा आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या