Uttar Pradesh: फुटबॉलर ते सर्वात तरुण मुख्यमंत्री...; म्हणून अखिलेश यांचं नाक वाकडं! जाणून घ्या काय आहे किस्सा
Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांनी भाजपला धक्क्यावर धक्के द्यायला सुरु केल्यानंतर उत्तर प्रदेशची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असं दिसतंय. जाणून घेऊया अखिलेश यादव यांच्याबद्दल काही न वाचलेल्या गोष्टी.
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलं आहे ते उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीकडे. मोदींचा करिष्मा आणि योगींचे कट्टर हिंदुत्व या मुद्द्यावर भाजप सहज बाजी मारेल असा कयास या आधी अनेकांनी व्यक्त केला होता. पण समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांनी या सर्वांना पुन्हा एकदा विचार करायची वेळ आणली आहे. सध्याचं वातावरण पाहता, उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजप विरुद्ध सप म्हणजे मोदी-योगी विरुद्ध अखिलेश यादव अशीच होणार असल्याचं चित्र आहे. फुटबॉलर ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री असा अखिलेश यादव यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. यावरही त्यांचं वाकडं असलेलं नाक त्यांची एक वेगळी ओळख कायम ठेवतं.
अखिलेश यादव यांचं नाक वाकडं का?
अखिलेश यांचे वडील मुलायमसिंह यादव पैलवान होते. म्हणून त्यांना राजकारणातील पैलवानही म्हटलं जायचं. पण मुलायमसिंह यादवांना जशी कुस्तीची आवड होती तशीच अखिलेश यांना फुटबॉलची. त्याच फुटबॉलच्या मोहापायी अखिलेश यांचं नाक वाकडं झालंय.
फुटबॉल खेळताना एकदा त्यांच्या नाकावर बॉल लागला आणि नाकाला दुखापत झाली. तेव्हा अखिलेश डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना एक प्रश्न विचारला, 'अखिलेश, तुमचं लग्न झालंय का?' त्यावर अखिलेश यांनी उत्तर दिले की, 'हो, माझं लग्न झालंय.' त्यावर डॉक्टरांनी सल्ला दिला की, 'असू द्या... कोणतेही ऑपरेशन करु नका'. अखिलेश यादवांनी डॉक्टरांचा तो सल्ला मानला आणि त्यांचं नाक तसंच राहिलं.
फुटबॉल खेळताना अखिलेश यांचं नाक वाकडं झालं ते कायमचंच. पण आता त्याच वाकड्या नाकामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री
अखिलेश मुलायमसिंह यादव वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाला त्याच्या निर्मितीनंतर राज्यात पूर्ण बहुमत मिळण्याची ती पहिलीच वेळ होती. खरं तर त्यावेळी आपल्या वडिलांना म्हणजे मुलायमसिंह यादवांना चौथ्यांदा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न अखिलेश यांचं स्वप्न होतं. पण ऐनवेळी अखिलेश यादव यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आलं. त्याच अखिलेश यादव यांची केवळ चार वर्षांत आपल्या पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी होईल असा विचार कदाचित त्यांच्या स्वत:च्याही मनात आला नसावा.
पण तसं घडलं... आणि त्याचं कारण अखिलेश यादव यांच्या आयुष्यातील राजकीय चढउतार.
अखिलेश यादवांची कारकीर्द
मुलायमसिंह आणि मालतीदेवी या दाम्पत्याचा अखिलेश हा एकुलता एक मुलगा. अखिलेश यांना लहानपणी टिपू या टोपणनावानं हाक मारली जायची. इटावाच्या सेंट मेरी स्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. अखिलेश यांचं माध्यमिक शिक्षण राजस्थानच्या सैनिकी शाळेत पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं.
ऑस्ट्रेलियातल्या सिडनी विद्यापीठातून अखिलेश यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 24 नोव्हेंबर 1999 रोजी अखिलेश यांचं डिंपल यादव यांच्याशी लग्न झालं. अखिलेश आणि डिंपल या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. आदिती, टीना, आणि अर्जुन अशी त्यांची नावं आहेत.
अखिलेश हे 2000 साली पहिल्यांदा कन्नौजमधून लोकसभेवर निवडून आले. मुलायम सिंहांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अखिलेश विजयी झाले. त्यानंतरही 2004 आणि 2009 साली अखिलेश यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली. 2012 साली उत्तर प्रदेशात सपाचं सरकार आलं आणि अखिलेश मुख्यमंत्री बनले. उत्तर प्रदेशचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा विक्रमही अखिलेश यांच्या नावावर आहे.
अखिलेश सत्ता काबिज करणार का?
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मोठे चढ-उतार झाल्याचं पहायला मिळतंय. कालपर्यंत सप केवळ किती मतं घेणार अशी चर्चा करणारे आज सप सत्तेत मुसंडी मारणार का असा प्रश्न विचारतायत.
महत्त्वाच्या बातम्या :