मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर, राज ठाकरेंवरही घणाघाती हल्ला
महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ दादरमध्ये उद्धवसाहेब ठाकरेंची जाहीर सभा झाली.
![मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर, राज ठाकरेंवरही घणाघाती हल्ला Uddhav Thackeray's reply to Devendra Fadnavis, attack on Raj Thackeray too, I am a patriot, not a fanatic मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर, राज ठाकरेंवरही घणाघाती हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/18/e43bdb456fd5d4a36ad92e866b9b20a217160300552461002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे (Raj Thackeray) प्रथमच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणातून राज यांनी मोदींचं कौतुक केलं, तर महाराष्ट्रासाठी काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर, मोदींनी मुंबईतील सभेतून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नकली शिवसेना म्हणत हल्लाबोल केला. तसेच, या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचा आवाज घुमत होता, अशी आठणही मोदींनी काढली. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दादर येथील सभेतून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर, फडणवीसांवर पलटवार करत भाजपा समर्थकांना डिवचलं आहे.
महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ दादरमध्ये उद्धवसाहेब ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप महायुती सरकावर हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील टीकेवरुन उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. हल्ली मी काहीही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जातोय. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो, यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले. अहो, मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन. सध्या माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जातोय. पण, मी देशभक्त आहे, मी अंधभक्त नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.
वापरा आणि फेकून द्या, हे भाजपचे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणतायेत. काही दिवसांनी मोदी हे, नकली आरएसएस असेही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएस ची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार आहे, असे म्हणत जेपी नड्डा यांच्या विधानावरुन ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं.
राज ठाकरेंवर घणाघात
इधर से, उधर से कल शिवाजी पार्क पर लेकर आये थे, सगळे भाडोत्री होते असे म्हणत राज ठाकरेंवरही नाव न घेता हल्लाबोल केला. ठाकरे नावाचा एक माणूस त्यांना पाहिजे होता, मग तोही त्यांनी भाडोत्री घेतलाय. आता नको काय बोलायला, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील, अशा सुपारी बहद्दरांवर नको बोलायला, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
'रोड शो'वरुन टीका
मोदी मुंबईला भिकारी करू पहात आहेत. घाटकोपर मध्ये रोड शो झाला, तो हिणकस होता. आशिया खंडातील महाकाय होर्डिंग कोसळलं. त्यात नेमके किती मृत्यू झाले, हा खरा आकडा समोर नाही. त्याच्याच बाजूला फुलांची उधळण करून, मोदींचा रोड शो काढण्यात आला, कशासाठी?, सांत्वन करायला केलं का हे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, या रॅलीसाठी मुंबई पालिकेने खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले.
अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील आणि समोरच्या उमेदवाराचेही व्हिडीओ तुमच्याकडे आले असतीलच. तो कोणासारखा आहे? रेवंण्णासारखा उमेदवार आहे? काय म्हणाले, रेवण्णासारखा? आता तुम्हीच हे सांगताय. मग सांगा तुम्हाला रेवंडा पाहिजे की अनिल देसाई सारखा, असा प्रश्न उपस्थित जनतेला ठाकरेंनी विचारला होता. दरम्यान, मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी दादरमधील भाषणाची सांगता केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)