Bapusaheb Pathare : मुलाची रणनीती अन् वडिलांचा विजय; बापू पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे किंगमेकर, सुनील टिंगरेंचा केला पराभव
Bapusaheb Pathare : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झाले. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा 5 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला.
Bapusaheb Pathare : राज्यभरासह पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात मात्र एका तरुणाने आपल्या रणनीतीच्या जोरावर वडिलांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झाले. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा 5 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. महायुतीकडून ही जागा भाजपच्या जगदीश मुळीक यांना जाणार की विद्यमान आमदार सुनील टिंगरे हेच वडगाव शेरीचे आगामी उमेदवार असणार यावरून जोरदार चर्चा रंगली होती. अखेरीस सुनील टिंगरे यांनी पुन्हा उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनुभवी उमेदवार असलेल्या बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली. आणि तेव्हापासून वडगाव शेरीचा सामना अटीतटीचा होईल अशी शक्यता वर्तवली गेली. आणि प्रत्यक्षात झाले ही तसेच. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात बापू पठारे यांनी आघाडी मोडून काढत तब्बल 5 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला.
दरम्यान स्थानिक असलेले बापूसाहेब पठारे माजी आमदार राहिले. सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला. मात्र मागील काही वर्षे ते काही कारणास्तव राजकारणापासून लांब राहिले. वडगाव शेरी 2014 आणि 2019 च्या निवडणूकीत भाजपचे योगेश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल टिंगरे यांनी विजय मिळवला होता. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बापू पठारे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी विधानसभेचे तिकीट मिळवलं आणि त्यात ते विजयी झाले.
विधानसभेच्या या लढाईत बापूसाहेब पठारे यांना मुलाची साथ लाभली ती म्हणजे मुलगा सुरेंद्र पठारे यांची. सुरेंद्र पठारे हे देखील मागील काही वर्षापासून वडगाव शेरीचा राजकारणात सक्रिय आहेत. या संपूर्ण परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मतदारसंघातील प्रत्येक छोट्या मोठ्या कामात त्यांनी सहभाग घेत अडचणी सोडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी आंदोलने ही केली आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले.
गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र पठारे यांनी मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवत कामाला सुरूवात केली. प्रत्येक गोष्टीत सहभागी होत त्यांनी मतदार संघतल्या अडचणी जाणून घेतल्या व सोबतच पर्यायाने त्या सोडविण्यासाठी लढा उभारला आणि आंदोलने केली. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी मागील काही वर्षात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. दीड महिन्यांपासून ते पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरत होते. आणि त्याचा परिणाम विजयात झाला. वडील बापूसाहेब पठारे यांच्या गळ्यात त्यांनी विजयाची माळ घातली.