Sharad Pawar : राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे दोन तीन लोक होते, त्यांनी पक्ष फोडला, शरद पवारांचं परळीत वक्तव्य, नेमका रोख कुणाकडे?
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे परळी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली. याठिकाणी त्यांनी पक्षफुटीवर भाष्य केलं.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारानिमित्त बीडच्या परळीत सभेला संबोधित केलं. राजेसाहेब देशमुख परळी विधानसभा मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीला तीन नेते जबाबदार असल्याचं सांगितलं. या सभेत त्यांनी त्या तीन नेत्यांची नाव सांगण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं. मात्र, शरद पवार यांनी परळीत येऊन हे वक्तव्य केल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत.
परळीत पक्ष फोडणाऱ्यांसदर्भात वक्तव्य, शरद पवारांचा रोख कुणाकडे?
पक्ष म्हणून काही संकट आली. अनेक अडचणी आहेत. राजकीय पक्ष उभा केला, काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैर विश्वास वाढवणारे दोन तीन लोक होते. त्या दोन तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला. ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली. ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा. राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असं शरद पवार म्हणाले.
परळीतल्या भाषणात उल्लेख
शरद पवार यांनी परळी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचाराचं भाषण करताना पक्षफुटीवर भाष्य केलं. पक्षफुटीला दोन तीन लोक जबाबदार असल्याचं ते म्हणाले. मात्र, त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. पक्षफुटीबद्दल भाषण करण्यासाठी परळीचीच निवड शरद पवारांकडून का करण्यात आली असावी याबाबत देखील चर्चा सुरु झाल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेस कधी फुटली?
राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात जुलै 2023 मध्ये फूट पडली होती. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ नेत्यांसह एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अदिती तटकरे, धर्मारावबाबा अत्राम,अनिल पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं होतं. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या समर्थनाची भूमिका घेतली होती.
दरम्यान, शरद पवार यांनी परळीच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात प्रामुख्यानं तीन लोक होते, असं म्हटलं. पुढं त्यांनी पक्ष फोडणाऱ्या, समाजात अंतर वाढवणाऱ्या आणि बीड जिल्ह्याचा आदर्श उद्धवस्त करणाऱ्यांना पराभूत करा, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांच्या भाषणाचा व्हिडीओ
इतर बातम्या :