नागपूरमध्ये आदिवासी समाजाचे लोक भेटून म्हणाले, आर.आर. पाटलांचा पोरगा सांगलीत निवडणूक लढतोय, त्याच्यावर लक्ष ठेवा,शरद पवार म्हणाले...
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी तासगावमधील सभेला संबोधित केलं

सांगली : शरद पवार यांनी तासगावमध्ये रोहित पाटील यांच्या प्रचारसभेला संबोधित केलं. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रोहित पाटील यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांचं आव्हान आहे. याच सभेत खानापूर मतदारसंघातील मविआचे उमेदवार वैभव पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन देखील शरद पवार यांनी केलं. यावेळी शरद पवार यांनी नागपूरमध्ये घडलेला एक किस्सा सांगितला.
गडचिरोलीच्या लोकांना आर.आर.पाटील यांच्या लेकाची चिंता
शरद पवार म्हणाले माझ्या दौऱ्याची सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातून केली. अनेक जिल्ह्यांमधून मी आज इथे आलो आहे. गेले काही दिवस घरी गेलेलो नाही. या जिल्ह्यात, या तालुक्यात सुरु आहे. पहिल्या दिवशी नागपूरची सभा संपली, काही आदिवासी समाजाचे लोक एका कोपऱ्यात थांबले होते. त्यांनी मला हात केला. मी थांबलो, त्यांना बोलावून घेतलं अन् विचारलं काही अडचण आहे का? ते म्हणाले काही अडचण नाही. मग कशासाठी थांबवलं असं विचारलं. यावर त्यांनी म्हटलं की आर.आर. पाटलाचा पोरगा तिकडं सांगलीकडं निवडणूक लढवतोय, त्याच्यावर लक्ष ठेवा. मग त्यांना त्यांचं गाव विचारलं. गडचिरोली असं त्यांनी सांगितलं, ते आदिवासींचं शहर आहे.मी त्यांना विचारलं आर. आर. पाटलाच्या पोरग्याची चिंता तुम्हाला का? यावर त्यांनी सांगितलं, आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना, आमच्या दैनंदिन प्रश्नांची चिंता आर.आर. पाटील यांनी घेतली. आमच्या प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांचे उपकार विसरु शकत नाही, असं ते म्हणाले. हे गडचिरोलीचा आदिवासी सांगतो. एवढी पुण्याई आर.आर. आबांच्या मागं असल्यानंतर मला चिंता करण्याचं कारण वाटत नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
संजयकाका पाटील यांच्यावर टीका
शरद पवार यांनी पुढं म्हटलं, एकेदिवशी आर.आर. पाटील माझ्याकडे आले होते, विधानपरिषदेच्या जागा भरायच्या आहेत, एका जागेसाठी माझा आग्रह असं ते म्हणाले. मी म्हटलं कुणाचा, त्यांनी सांगितलं संजय पाटलांचा, मी त्यांना म्हटलं पसंत नाही दुसरं नाव सांगा. पण आर.आर. यांचा आग्रह मोडणं शक्य नव्हतं, आम्ही मान्य केलं. ते आमदार झाले, पाच सहा वर्ष राहिले. गमतीची गोष्ट ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला तेव्हा नवा पक्ष, भाजपमध्ये गेले, लोकसभा लढवली. 10 वर्ष मिळाली. मतदारसंघात काय चाललंय विचारायचो तेव्हा त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांची चर्चा करायचे नाहीत. खासदारकी संपल्यानंतर आता नव्या पक्षात गेलेत, असं शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
