Devendra Fadanvis : चालली नाही पवारांची 'पॉवर', राज्यसभेवर फक्त देवेंद्र फडणवीसांचा वावर
Rajya Sabha Election 2022 : या सामन्याचे देवेंद्रे फडणवीसच 'मॅन ऑफ द मॅच' असून त्यांनी पवारांसारखे दिग्गज समोर असताना महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.
मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या सामन्याचे 'मॅन ऑफ द मॅच' हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. समोर शरद पवार यांच्यासारखा दिग्गज असतानाही त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.
'निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती' असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला.
निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2022
तर जिंकण्यासाठी लढविली होती...
जय महाराष्ट्र ! #RajyaSabhaElections2022 #Maharashtra
देवेंद्र फडणवीस या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आल्याने आनंदाचा क्षण आहे. हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. राज्यातील लोकांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बहुमत दिलं होतं."
धनंजय महाडिकांनी संजय राऊतांपेक्षा जास्त मतं घेतली
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय महाडिक यांनी 41.5 मतं मिळाली तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना 41 मतं मिळाली. जे मत बाद झालं, ते मत ग्राह्य धरलं असतं, किंवा मलिकांना मताचा अधिकार दिला असता तरी आमचा उमेदवार निवडून आला असता. यामध्ये ज्या अपक्षांनी आम्हाला मतं दिली त्यांचे आभार. जे स्वत:ला महाराष्ट्र समजतात, त्यांना या विजयाने लक्षात आलं असेल की ही जनता म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे ती आता कायम सुरू राहिल.
चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाची भेट
हा विजय म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाची भेट असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकीकडे मतमोजणी सुरू असताना, टेन्शन वाढलं असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला.
देवेंद्र फडणवीसांचे करेक्ट प्लॅनिंग
धनंजय महाडिकांच्या विजयानंतर भाजपच्या गोटात सेलिब्रेशन सुरू आहे. सकाळी 9 वाजता मतदान सुरु झालं तेव्हापासूनच भाजपमध्ये मोठा विश्वास होता. विजयी खासदार अनिल बोंडेंनी तर निकाल वर्तवलाही होता. पण तेव्हा देखील महाविकास आघाडीनं आपलाच विजय होणार असा दावा केला. हे सगळं सुरु असतानाच भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस मात्र मतदान प्रक्रियेत बिझी होते. एक-एक मत कसं आपल्या बाजूनं पडेल याकडेच त्यांचं लक्ष होते. आजारी लक्ष्मण जगताप मतदानासाठी आले, तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्याचं स्वागत केलं आणि याच मेहनतीला मध्यरात्री 3.30 नंतर यश आलं.
महाविकास आघाडीची 10 मतं फुटली
सगळ्यात धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीची 10 मतं फुटली आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन केलं, चार उमेदवार जिंकणार असे दावे केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पडद्याआड राहुन निवडणुकीचं प्लॅनिंग केलं. मतदानाच्या काही तास आधी आमदारांना विश्वासही दिला आणि तोच विश्वास निकालानंतर खरा ठरला.