अमरावतीत मुख्यमंत्र्याच्या सभेत 'निषेध.. निषेध..'च्या घोषणा
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मुख्यमंत्र्यांची ही सभा होती. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच 20 ते 25 जनांनी निषेध असो अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.
अमरावती : अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत काही धरणग्रस्तांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काही धरणग्रस्तांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मुख्यमंत्र्यांची ही सभा होती. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच 20 ते 25 जनांनी निषेध असो अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. योग्य मोबदला आणि पुनर्वसन न झाल्यानं प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांसमोर गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. घोषणाबाजी करणाऱ्या लोकांची जमीन धरणात गेली असून या लोकांना आपल्या जमिनीचे द्यावेत अशी या लोकांची मागणी आहे.
दरम्यान गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा पुन्हा सुरळीत पार पडली. एकीकडे काही लोकांकडून निषेध-निषेध नारे दिले जात होते, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते मोदी-मोदीची घोषणाबाजी करत होते. मात्र या सर्व प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी काही वेळ मोठा गोंधळ उडाला.