(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुलगा जन्माला आला नाही त्याचं लग्न कुठे करायचं याचा विचार करणे योग्य नाही; राज ठाकरेंच्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांचा मिश्किल टोला
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सोबत असेल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता त्यांनी मिश्किल टोला लगावत प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या 'माझ व्हिजन माझा महाराष्ट्र' या कार्यक्रमामध्ये पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सोबत असेल, असे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता राज ठाकरे जे बोलले आहेत त्यायावर मला इतकच म्हणायचे आहे की, आधी कोणाच्या किती जागा निवडून येतात त्याचा विचार करणे योग्य आहे. तर राज ठाकरेंना टोला लगावत अजून मुलगा जन्माला आला नाही, त्याचं लग्न आणि साक्षगंध कुठे करायचं हे ठरवणे योग्य नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
नवाब मलिकांना मदत करायची नसेल तर ती त्यांची इच्छा
नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये अनेक वादंग पाहायला मिळत आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार देखील दिला आहे. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता पटेल यांनी सांगितले की, नवाब मलिक आमचे सहकारी आहेत. आमदार मंत्री सर्व पदावर ते राहिले आहेत. तसेच त्यांनी कुठलाही गुन्हा केला आहे, असं कोर्टात सिद्ध झालेले नाही. आम्ही त्यांना तिकीट दिले आहे. भाजप आणि शिवसेनेला त्यांची मदत करायची नसेल किंवा दुसरा उमेदवार द्यायचे असेल तर ती त्यांची इच्छा आहे. मात्र याच्यामुळे महायुतीच्या इतर दुसऱ्या जागांवर परिणाम होणार नाही, याची काळजी आम्हाला असून आम्ही ती घेणार अशी सावध भूमिका देखील यावेळी प्रफुल्ल पटेलांनी घेतली. ते गोंदिया येथे माध्यमांशी बोलत होते.
पवार कुटुंबांच्या आंतरिक विषयात भाष्य करावे हे मला योग्य वाटत नाही
पवार कुटुंबीयांचे दोन ठिकाणी दिवाळी पाडवा होत आहेत. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता यावर ते म्हणाले की, पवार कुटुंबांचे जे काही आंतरिक विषय आहेत त्याच्यामध्ये मी भाष्य करू इच्छित नाही. गेल्या 40-50 वर्षांपासून पवार कुटुंबीयांसोबत माझे जवळचे संबंध राहिलेले आहेत. हे संबंध आजही आहेत आणि कायम राहतीलच, पण त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही आंतरिक विषय झाले असतील त्यात मला बोलणं योग्य वाटत नाही, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या