Parth Pawar: 'काटेवाडीत आता दरवर्षी पाडवा साजरा होणार', पार्थ पवारांची 'एबीपी'शी बोलताना माहिती, म्हणाले, 'दादांची अन् साहेबांची विचारधारा वेगळी...'
Parth Pawar on Padwa : काटेवाडीत अजित पवारांचा तर गोविंदबागेत शरद पवारांचा पाडवा उत्सव सुरू आहे. दोन्हीकडे कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत.
बारामती: काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. त्यानंतर पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर आता दरवर्षीप्रमाणे होणारा पवार कुटुंबाचा पाडवा देखील आता एकत्र न होता वेगवेगळा पार पडत आहे. पक्षानंतर आता कार्यक्रमातही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीमध्येच शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपला दिवाळी पाडवा साजरा करत आहेत. काटेवाडीत अजित पवारांचा तर गोविंदबागेत शरद पवारांचा पाडवा उत्सव सुरू आहे. दोन्हीकडे कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत. अजित पवार, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आहेत. यावेळी एबीपी माझाशी बोलताना पार्थ पवार म्हणाले, काटेवाडीत आता दरवर्षी पाडवा साजरा होणार आहे.
काय म्हणालेत पार्थ पवार?
आता दरवर्षी दिवाळीचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. पहिल्यांदाच जरी बारामतीत पाडवा दोन ठिकाणी होत असला तरी काटेवाडीच्या पाडव्याला खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे. राज्यभरातून लोक अजितदादांना भेटण्यासाठी आले आहेत याच्या वरूनच आपण अंदाज लावू शकता लोक कुणासोबत आहेत. याच्यापुढे दरवर्षी बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा केला जाणार अजित पवार हे काटेवाडीमध्येच दिवाळीचा पाडवा साजरा करणार असल्याचं पार्थ पवारांनी म्हटलं आहे. तर अजित दादांची आणि शरद पवारांची विचारधारा ही वेगळी आहे म्हणून आता पक्ष वेगळं झालं आहे. निवडणूक आहे त्यामुळे भाऊबीज देखील आम्ही लोकांसोबतच साजरी करणार आहोत, लोकांमध्ये संभ्रम नको असंही पुढे पार्थ पवार म्हणालेत.
पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा
गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण पवार कुटुंब ‘गोविंदबाग’ या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीत पाडवा साजरा करत आलं आहे. दिवाळी पाडव्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते एकत्र येत, शुभेच्छा देत. मात्र आता पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई ...
'सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली आहे. यामध्ये ९९ टक्के सोन्याचा अर्क आहे, अजित पवारांसाठी ही मिठाई बनवली आहे, एक आठवडा ही मिठाई बनवण्यात आली आहे. चितळे बंधु यांच्याकडून ही मिठाई तयारी करण्यात आली आहे', अशी माहिती यावेळी या कार्यकर्त्यांने दिली आहे.