महायुतीच्या बॅनरवरून आमदार संजय गायकवाडांच्या फोटो गायब; बुलढाण्यात भाजप- शिवसेनेतील वाद शिगेला?
बुलढाण्यात महायुतीतील जिंकून आलेल्या सहा पैकी फक्त आमदार संजय गायकवाड यांचे नाव आणि फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळे बुलढण्यात महायुतीतील राजकीय द्वंद्व सुरू आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.
बुलढाणा: अखेर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याचा फैसला आज होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आजच भाजपच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल, अशीच चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे.
अशातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीमध्ये (Mahayuti) अजून निर्णय झालेला नसताना राज्यभरात आपल्या नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याआधी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि शपथविधी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे लागलेले बुलढण्यातील बॅनर सऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पुन्हा एकदा शपथविधीपूर्वी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर बुलढाण्यातील संगम चौकात लावण्यात आले असून या बॅनरवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचा फोटो वगळता महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व शिलेदारांचे फोटो झळकलेले दिसताय. त्यामुळे बुलढण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या अंतर्गत राजकीय द्वंद्व सुरू आहे का? असा प्रश्न नव्यानं विचारला जाऊ लागला आहे.
महायुतीच्या बॅनर वरून आमदार संजय गायकवाड गायब?
तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि मंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. बुलढाणा शहरातील संगम चौकात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शपथविधी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तसेच " राज तिलक की करो तयारी आ रही है भगवाधारी" आणि "बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन "अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले असून या बॅनरवर महायुतीतील जिंकून आलेल्या सहा पैकी फक्त आमदार संजय गायकवाड यांचे नाव आणि फोटो वगळण्यात आला आहे. तर आता फक्त कमळच, असा मजकूर माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या फोटो समोर लिहिण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील महायुतीत असलेली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
आमदार संजय गायकवाडांकडून मोठा गौप्यस्फोट
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याच पक्षातल्या नेत्यांनी निवडणुकीत गद्दारी केल्याचं गायकवाडांचं म्हणणं आहे. त्यांचा रोख होता तो शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याकडे. माझ्याच पक्षातील प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांना फोन करून माझ्या विरुद्ध तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याच सांगितलं. भाजपाच्या संजय कुटे यांनी कट रचून अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली असा दावा संजय गायकवाडांनी केला.
संजय गायकवाडांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबांसारख्या मोठ्या नेत्यांचं नाव घेतल्यानं एकच खळबळ माजली. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड आमदार झाले. संजय गायकवाडांना सर्वाधिक 91 हजार 660 मतं मिळाली. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री शेळकेंना 90 हजार 819 मतं मिळाली. त्यामुळे संजय
गायकवाड अवघ्या 841 मतांनी जिंकले.
ही बातमी वाचा: