Parli Vidhansabha Election : धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांचा डाव, परळीत मराठा कार्ड, राजेसाहेब देशमुख कोण आहेत?
Parli Vidhansabha Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी (दि.27) नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
Parli Vidhansabha Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज (दि.27) नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात उमेदवार देण्यात आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने परळीत राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसला खिंडार पाडत पवारांची राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार (Sharad Pawar) नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवार देतात? त्याची उत्सुकता लागली होती. आता शरद पवारांनी या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवारांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला आणि हा प्रवेश झाल्यानंतर त्यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुंडेंच्या विरोधात शरद पवार कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अशातच पवारांची खेळी या मतदारसंघात महत्त्वाची मानली जाते आहे.
2019 मध्ये पंकजा मुंडेंचा पराभव
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजे साहेब देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची उमेदवारी परळीतून जाहीर केली. त्यामुळे परळीत धनंजय मुंडे विरुद्ध राजसाहेब देशमुख असा होणार सामना रंगणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. मात्र, त्यावेळी धनंजय मुंडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते.
कोण आहेत राजेसाहेब देशमुख?
राजसाहेब देशमुख हे सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झाले आहेत. राजेसाहेब देशमुख हे यापूर्वी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती होते. काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून राजेसाहेब देशमुख यांची ओळख आहे. शरद पवारांची परळी मतदारसंघात मुंडेंविरोधात खेळी करत त्यांना उमेदवारी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा कार्डचा वापर करण्यात आलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांची 9 उमेदवारांची तिसरी यादी, चिंचवडचा पत्ता उलगडला; धनंजय मुंडेंविरुद्धही उमेदवार ठरला