राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. अनेक जण भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.
विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजेंनी दाखवली असल्याचं कळत आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत असणारा कलह गेल्या काही दिवसात सर्वांच्या समोर आला होता. यातूनच उदयनराजेंचे बंधू आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केला होता.
त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली होती. आता उदयनराजेही भाजपाच्या वाटेवर असल्याचं समोर येत आहे. उदयनराजे जर भाजपात गेले तर शिवेंद्रराजेंची नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. अनेक जण भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र ही गळती रोखण्यासाठी उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची हवा निर्माण करण्याची खेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खेळल्याचं बोललं जात आहे.
याआधी राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक, सचिन अहिर, चित्रा वाघ असे अनेक नेते शिवसेना, भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीत चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता उदयनराजेही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत या चिंतेत भर पडली आहे.
संबंधित बातम्या