जयदत्त क्षीरसागरांचा 'लढा' कुणासोबत? फेसबूक पोस्टची बीडमध्ये चर्चा
जयदत्त क्षीरसागरांनी वज्रमूठसोबत 'लढा' अशी पोस्ट फेसबुकवर टाकल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात हा लढा नेमका कोणासोबत आहे या चर्चांना उधाण आलं आहे.

बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेतील विधिमंडळ गट उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन लढा अशी पोस्ट टाकून आपली भूमिका निर्णायक असल्याचं सूतोवाच केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका ठरविण्यासाठी उद्या म्हणजे 5 एप्रिलला जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. बीड शहरातील आशीर्वाद लॉन्सवर ही बैठक होणार आहे आणि याच बैठकीत नेमकं कुणासोबत जायचं यावर फैसला होणार आहे.
जयदत्त क्षीरसागरांनी वज्रमूठसोबत 'लढा' अशी पोस्ट फेसबुकवर टाकल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात हा लढा नेमका कोणासोबत आहे या चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून क्षीरसागर बंधू राष्ट्रवादीपासून दूर पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादीपासून दुरावा ठेवणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपाच्या गोटात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केल्याचं चित्र यापूर्वी पाहायला मिळालं होतं.
काही दिवसांपूर्वी क्षीरसागर सेनेत जाणार असल्याच्याही चर्चाही रंगल्या होत्या. आता जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना बोलावून क्षीरसागर बंधू निर्णय घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने संदीप क्षीरसागरांच्या मागे पूर्ण ताकत लावली असताना जयदत्त क्षीरसागर मात्र लढा उभा करत आहेत. आता उद्याच्या बैठकीत जयदत्त क्षीरसागर नेमका कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
