Maval Assembly constituency 2024 : 'मावळ पॅटर्न’ फसला; सुनील शेळकेंची जादू चालली, मोठ्या मताधिक्यांनी मिळवला विजय
Maval Assembly constituency 2024 : मावळ पॅटर्नमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळकेंची अडचण वाढली असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र, मावळ पॅटर्न फसल्याचं चित्र दिसून येत आहे.
पुणे: मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी 2019 मध्ये इतिहास घडवला. तब्बल 25 वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने विद्यमान आमदार सुनील शंकरराव शेळके यांना मावळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षात बंड पुकारून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात मावळ पॅटर्नची चर्चा सुरू झाली होती. मात्र, या मावळ पॅटर्नचा कसलाही फटका सुनील शेळके यांना बसलेला नाही. उलट पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत. त्यांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले आहे.
मतदारसंघाचा इतिहास
मावळ मतदारसंघात 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नामदेव मोहल विजयी झाले होते. त्यानंतर 1972 मध्ये भारतीय जनसंघाने ही जागा जिंकली. त्यानंतर 1990 पर्यंत ही जागा फक्त काँग्रेस जिंकत राहिली. 1995 ते 2014 या काळात भारतीय जनता पक्षाने ही जागा जिंकली होती. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके विजयी झाले. 2019 मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. ही जागा पूर्णपणे काँग्रेस आणि भाजपचा बालेकिल्ला आहे. सुरुवातीला काँग्रेसने बाजी मारली होती, त्यानंतर भाजपने ही जागा जिंकली.
मतदारसंघातील परिस्थिती कशी?
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी थेट लढत आहे. या जागेवर काही काळ भाजपचे वर्चस्व होते. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके विजयी झाले होते. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून सुनील शेळके यांना तिकीट देण्यात आले आहे. सुनील शेळके यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील विरोध केला होता. त्यानंतर बैठका घेत त्यांना मदत न करण्याचं देखील त्यांनी ठरवलं होतं. मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महविकास आघाडीच्या घटक पक्षांनी अधिकृत पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला आहे. सुनील शेळके यांना त्यांच्याच पक्षातील नेत्याने आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचे समर्थक असलेल्या बापूसाहेब भेगडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते.
उमेदवारांची नावे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचे समर्थक असलेल्या बापूसाहेब भेगडे हे (अपक्ष) म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने महायुतीकडून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?
सुनील शेळके यांना 2019च्या निवडणुकीमध्ये 167712 इतकी मतं मिळाली होती तर भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांना 73770 इतकी मतं मिळाली होती.