Nashik Mahanagarpalika Election 2026: 'मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, गुलाल उडवल्याशिवाय थांबणार नाही'; मुकेश शहाणे निवडणूक लढवण्यावर ठाम, महाजनांना समजूत काढण्यात अपयश
Nashik Mahanagarpalika Election 2026: गिरीश महाजन आणि मुकेश शहाणे यांची महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, शहाणे यांची समजूत काढण्यात महाजन यांना अपयश आल्याची माहिती मिळत आहे.

Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Mahanagarpalika Election 2026) पार्श्वभूमीवर भाजपमधील (BJP) बंडखोरी अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याशी झालेल्या बैठकीनंतरही निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवत माघार न घेण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे. “मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. गुलाल उडवल्याशिवाय थांबणार नाही,” असे म्हणत शहाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Girish Mahajan: गिरीश महाजन समजूत काढण्यात अपयशी
भाजपमध्ये उफाळलेल्या बंडखोरीला थोपवण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने भाजपसाठी हा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आणि मुकेश शहाणे यांची महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, शहाणे यांची समजूत काढण्यात महाजन यांना अपयश आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mukesh Shahane: “चर्चा पॉझिटिव्ह, पण निवडणूक लढवणार”
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुकेश शहाणे म्हणाले, “मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा पॉझिटिव्ह झाली आहे. मात्र मी निवडणूक लढवणारच आहे. एबी फॉर्मच्या गोंधळावर मला आज बोलायचं नाही. गिरीश महाजन अर्धा तासात मला निरोप देणार आहेत.” सूत्रांच्या माहितीनुसार, गिरीश महाजन यांनी शहाणे यांना माघार घ्यावी, असा निरोप दिला आहे.
Deepak Badgujar vs Mukesh Shahane: दीपक बडगुजर यांच्या विरोधात ठाम
भाजपने प्रभाग क्रमांक 25 मधून सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबाला उमेदवारी दिली आहे. बडगुजर यांच्या पत्नी हर्ष बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्याच प्रभागातून त्यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनीही अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर याच प्रभागातून माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनाही भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना आधीच दीपक बडगुजर यांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केल्याने, छाननीत शहाणे यांचा अर्ज बाद झाला आहे. मात्र, भाजपचे उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात मुकेश शहाणे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
Sunil Kedar: भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांची प्रतिक्रिया
दरम्यान, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते उमेदवार माघार घेतील. मुकेश शहाणे अपक्ष उमेदवारी माघार घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय होईल. दुपारी तीन वाजेनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. कमळ चिन्हाचेच उमेदवार निवडणुकीत असतील. काही उमेदवारांना पुरस्कृत करण्याची चर्चा असली तरी अंतिम निर्णय बाकी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा




















