एक्स्प्लोर
मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान
अकोला जिल्ह्यातील सर्वात मागास मतदारसंघ असा कलंक कायम या मतदारसंघाच्या माथी लागलेला आहे. निवडणुका आल्या की विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना भुरळ घातली जाते. मात्र, नंतर मतदारसंघाच्या विकासापेक्षा नेते 'स्वविकासा'त मग्न होतात. मुर्तिजापूर मतदारसंघाच्या मागासलेपणाचं हेच प्रमुख कारण असावं.
मुर्तिजापूर हा अकोला जिल्ह्यातील विधानसभेचा एकमेव राखीव असलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मुर्तिजापूर आणि बार्शिटाकळी या दोन तालूक्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या मतदार संघात दोन अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसचा सूर्य या मतदारसंघातून मावळत नाही, असे पूर्वी बोलले जायचे. परंतु 1990 च्या दशकात प्रकाश आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न' आणि भाजपचा या मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उदय झाला. अन काँग्रेसही येथून हद्दपार झाली ती आजतागतपर्यंत. 1995 पासून या मतदारसंघावर सलग भाजपचं वर्चस्व आहे. 2004 चा अपवाद वगळता भाजपने या मतदारसंघावरील आपला प्रभाव कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी येथे भाजपला फायदा झाला तो भारिप-बहुजन महासंघ, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतविभाजनाचा.
2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपचे हरीश पिंपळे यांनी येथून विजय मिळवला. 2014 मध्ये त्यांनी 12,888 मतांनी भारिप-बहूजन महासंघाचा पराभव केला. मात्र, सध्या आमदार पिंपळे यांना पक्षांतर्गत मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सध्याही भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकिटांसाठी राजकीय साठमारी सुरु झाली आहे. भाजपच्या अंतर्गत पाहणीतील 'रेड झोन'मध्ये असलेल्या मतदारसंघांमध्ये मुर्तिजापूरचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावेळी भाजपकडून तिकीट मिळवताना विद्यमान आमदार हरीश पिंपळेंची मोठी दमछाक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
2014 च्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
1. हरीश पिंपळे : भाजप : 54,226 मतं
2. राहूल इंगळे : भारिप-बमसं : 41,338 मतं
3. महादेव गवळे : शिवसेना : 24,486 मतं
4. श्रावण इंगळे : काँग्रेस : 18,044 मतं
5. डॉ. सुधीर विल्हेकर : राष्ट्रवादी : 7,520 मतं
विजयी मताधिक्य : हरीश पिंपळे : भाजप : 12,888 मतं
मुर्तिजापूर हा अकोला पूर्वनंतर जिल्ह्यातील दुसरा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची मतदारसंख्या तब्बल 3 लाख 18 हजार 220 इतकी आहे. मुर्तिजापूर म्हणजे विविध राजकीय प्रयोगांना ताकद देणारा मतदारसंघ. त्यामुळेच नव्वदच्या दशकात आंबेडकरांच्या मदतीने मखराम पवारांनी येथून अपक्ष म्हणून विजय मिळवला. राज्यभरात दलित आणि अठरापगड जातींना एकत्र आणणारा 'पॅटर्न' म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'ला ओळखलं जातं. मात्र, 2009 पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात त्यांना अद्यापपर्यंत विजय साकारता आला नाही. यावेळी 'वंचित बहूजन आघाडी'च्या माध्यमातून आंबेडकरांनी आपल्या राजकीय कक्षा रूंदावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामूळेच आंबेडकरांचा या मतदारसंघावर विशेष 'वॉच' आहे. मात्र, येथील मतदार दलितांमध्ये 'हिंदू दलितां'चा पर्याय आपला आमदार म्हणून निवडतात, ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामूळे मुर्तिजापूर मतदारसंघ यावेळी हा पायंडा कायम ठेवतो, की मोडीत काढतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मुर्तिजापूर मतदार संघातील मतदार संख्या
1. एकूण मतदार : 3,18,220
2. पुरूष मतदार : 1,62,788
3. महिला मतदार : 1,55,427
विधानसभेची निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांत सध्या तिकीटासाठी मोठी चुरस सुरु झाली आहे. सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे सत्ताधारी भाजपात. विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळण्यात पक्षांतर्गत मोठी स्पर्धा आहे. भाजपच्या जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील असे दोन गट आहेत. पिंपळे आधी धोत्रे गटात होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांचे धोत्रे गटाशी बिनसलं आणि ते पालकमंत्र्यांच्या गटात गेले. गेल्या वर्षभरात त्यांनी परत धोत्रेंशी संधान बांधायला सुरुवात केली आहे. मात्र, धोत्रेंनी पिंपळेंना टक्कर देऊ शकणारे काही सक्षम पर्याय या मतदारसंघात निर्माण केले आहेत. 1999 मध्ये संजय धोत्रे स्वत: या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. त्यामूळे त्यांचं या मतदारसंघावर मोठं वर्चस्व आहे. त्यामुळे हरीश पिंपळेंच्या राजकीय भवितव्याचा फैसला संजय धोत्रेंच्या पवित्र्यावर ठरणार आहे. लोकसभेत मुर्तिजापूर मतदारसंघात धोत्रेंना 37,885 मतांचं मताधिक्य मिळालं आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मतं
1. संजय धोत्रे : भाजप : 90,115 मतं
2. प्रकाश आंबेडकर : वंचित बहूजन आघाडी : 52,230 मतं
3. हिदायत पटेल : काँग्रेस : 37,450 मतं
मताधिक्य : संजय धोत्रे : भाजप : 37,885 मतं
भाजपच्या येथील इतर प्रमुख दावेदारांमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे यांचं नाव प्रामुख्यानं समोर केलं जात आहे. ते मागच्या वेळी येथून काँग्रेस उमेदवार होते. यासोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांचेही नाव येथे भाजपकडून चर्चेत आहे. याशिवाय राजकुमार नाचणे, गजानन भटकर आणि त्रिरत्न उर्फ बंडू इंगळे यांचाही उमेदवारीसाठी पक्षाकडे दावा असणार आहे.
युतीमध्ये शिवसेनेने जिल्ह्यात पाचपैकी दोन जागांची मागणी केली आहे. यातील बाळापूरची जागा शिवसेनेला देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. दुसऱ्या जागेसाठी मुर्तिजापूरसाठीही शिवसेनेचा मोठा आग्रह आहे. आमदारांविरोधात नाराजीचा मुद्दा पुढे करीत शिवसेनेचा मुर्तिजापूरवर दावा आहे. शिवसेनेकडून गतवेळचे उमेदवार आणि जिल्हा परिषद सदस्य महादेव गवळे यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी तिकीटाचं आश्वासन देत भाजपमधून पक्षात आणलेले प्राचार्य श्रीप्रभू चापके यांचंही नाव दावेदारांच्या यादीत आहे.
मागच्या सर्व निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भारिप-बहूजन महासंघ दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. यावेळी वंचितच्या झेंड्याखाली निवडणुकीत उतरणाऱ्या या पक्षांत भाजपपेक्षा अधिक दावेदार आहेत. प्रमुख दावेदारांमध्ये जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा अवचार, संदीप सरनाईक, संजय नाईक यांचा समावेश आहे.
या मतदार संघावर 2004 मध्ये प्रा. तुकाराम बिरकड यांच्या रूपाने एकदा राष्ट्रवादीचाही झेंडा फडकलेला आहे. भाजप, वंचितबरोबरच राष्ट्रवादीमध्येही इच्छूकांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेतलं नाव आहे रविकुमार राठी या युवा नेत्याचं. राठी यांनी गेल्या पाच वर्षांत रुग्णसेवा, आरोग्य तपासणी मेळावे, रक्तदान शिबीरं, रोजगार मेळाव्यातून स्वत:चं नाव सातत्यानं चर्चेत ठेवलं आहे. त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच बड्या नेत्यांनी हिरवा कंदील दिला आहे. राष्ट्रवादीच्या इतर चर्चित इच्छूकांमध्ये जेष्ठ नेते प्रा. विश्वनाथ कांबळे, गतवेळचे उमेदवार डॉ. सुधीर विल्हेकर, श्रावण रणबावळे यांचा समावेश आहे. काँग्रेस या मतदार संघावर दावा करीत असली तरी काँग्रेसकडे येथे स्वत:चा सक्षम उमेदवारच नाही.
सर्वपक्षीय प्रमुख दावेदार
1. भाजप : विद्यमान आमदार हरीश पिंपळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, राजकुमार नाचणे, बंडू उर्फ त्रिरत्न इंगळे, गजानन भटकर
2. भारिप-बहूजन महासंघ : जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, प्रतिभा अवचार, संदीप सरनाईक, संजय नाईक.
3. शिवसेना : महादेव गवळे, प्राचार्य श्रीप्रभू चापके.
4. राष्ट्रवादी : जेष्ठ नेते प्रा. विश्वनाथ कांबळे, युवानेता रवी राठी, डॉ. सुधीर विल्हेकर
जिल्ह्यातील सर्वाधिक मागास मतदारसंघ अशी मुर्तिजापूर मतदारसंघाची ओळख आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या मुर्तीजापूर शहराला पावसाळ्याचे काही महिने सोडले तर वर्षभर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम भेडसावत असतो. एम.आय.डी.सी.अद्यापही उद्योगांची वाट बकाल अवस्थेत आहे. कोणतेही मोठे उद्योग नसल्याने येथील बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. येथील शेती ही खार-पाण पट्ट्यात येणारी आहे. त्यामूळे येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. इतर सिंचन सुविधांचा मोठा अभाव मतदारसंघात आहे. महान येथील काटेपुर्णा प्रकल्पाचं पाणी सिंचनापेक्षा जिल्ह्यातील पेयजलासाठी वापरण्यात येतं. त्यातच या मतदार संघातील बॅरेजेसचं काम अद्यापही अपूर्ण आहे. कृषीवर आधारित उद्योगांची मोठी वाणवा येथे दिसून येते. याशिवाय मुर्तिजापुरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला विषय म्हणजे ऐतिहासिक 'शकुंतला रेल्वे' या रेल्वे मार्गाचा 'ब्रॉडगेज' करण्याचा प्रश्न अद्यापही तसाच प्रलंबित आहे.
मुर्तिजापूर मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
1. मुर्तिजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
2. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था
3. कृषीवर आधारित उद्योगांची वाणवा
4. अपुर्ण बॅरेजेसमूळे सिंचनाची वाणवा
5. शकुंतला रेल्वे'चा मार्ग 'ब्रॉडगेज' करण्याचा प्रश्न प्रलंबित
जिल्ह्यातील सर्वात मागास मतदारसंघ असा कलंक कायम या मतदारसंघाच्या माथी लागलेला आहे. निवडणुका आल्या की विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना भुरळ घातली जाते. मात्र, नंतर मतदारसंघाच्या विकासापेक्षा नेते 'स्वविकासा'त मग्न होतात. मुर्तिजापूर मतदारसंघाच्या मागासलेपणाचं हेच प्रमुख कारण असावं. हे दुष्टचक्र या निवडणुकीत थांबणार का? निवडणुकीतील विकासाची आश्वासनं प्रत्यक्षात उतरणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळण्याच्या आशेने येथील मतदार पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement