अंबरनाथमध्ये महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या बॅनरवर मनसेचे पदाधिकारी
कल्याण लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांचाही फोटो टाकण्यात आला आहे.
कल्याण : एकीकडे मनसेच्या सभांचा खर्च कुणाच्या खात्यात टाकायचा, यावरुन संभ्रम असताना मनसे पदाधिकाऱ्यांचे फोटो मात्र उघडपणे महाआघाडीच्या बॅनर्सवर झळकू लागले आहेत. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.
कल्याण लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांचाही फोटो टाकण्यात आला आहे. राज ठाकरे हे मोदी आणि शाहांच्या विरोधात प्रचार करत असले, तरी त्यांनी महाआघाडीला मतदान करा, अशी कुठलीही जाहीर भूमिका घेतलेली नाही.
त्यामुळेच त्यांच्या सभांच्या खर्चावरुनही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो उघडपणे महाआघाडीच्या बॅनर्सवर झळकू लागल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत कुणाल भोईर यांना विचारलं असता, मोदी आणि शाहांना पाडण्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी असल्याचं ते म्हणाले. मात्र आपला फोटो बॅनरवर कुणी टाकला, याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरेंच्या सभा कुणासाठी? भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव
दुसरीकडे मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत नसताना राज ठाकरे महाराष्ट्रभर प्रचार सभा घेत आहेत. मग राज ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभा कोणासाठी आहेत? आणि या जाहीर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा? यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी भाजपा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
UNCUT | नांदेडमध्ये राजगर्जना, राज ठाकरेंचं नांदेडच्या सभेतील संपूर्ण भाषण