मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा पॅटर्न बदलला, 1 लाख लोकांसह सामूहिक उपोषण, कुणाला पाडायचं हे सांगितलं
Manoj Jarange Patil : विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मोठे उपोषण सुरू करणार आहे. या उपोषणामध्ये एक लाखाहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आलाय.
Manoj Jarange Patil बीड: विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रिंगणातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेण्याची घोषणा केली होती. फक्त एका जातीच्या बळावर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आता मराठा समाजाने आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडावे, असा आदेश जरांगे पाटील यांनी दिला होता. यानंतर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बुधवारपासून बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय. गेवराई तालुक्यातील त्वरिता देवीचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. अशातच मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये आज गेवराईमध्ये समर्थकाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास्थळी बोलताना मनोज जरांगे पाटील पुन्हा मोठे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
मराठा समाजाचा हिसका काय ते आता दाखवूनच देऊ!- मनोज जरांगे
विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मोठे उपोषण सुरू करणार आहे. या उपोषणामध्ये एक लाखाहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. तर उपोषणाला येत असताना समाज बांधवांनी आपल्याला आवश्यक असणारे सर्व साहित्य घेऊन यावे, तसेच विशेष करून येत असताना अंथरणे व पांघरण्यासाठी कपडे देखील घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारची झोप उडवण्यासाठी आता मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. यांना मराठा समाजाचा काय हिसका आहे ते दाखवूनच देऊ, उपोषणासारखी ताकद कोणत्याही आंदोलनामध्ये नाही. एक लाख समाज बांधव उपोषणाला बसल्यानंतर किती डॉक्टर त्यांना लागतील हे सांगता येत नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय त्यांना पाडा- मनोज जरांगे पाटील
गेवराईमध्ये उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयातून अन्याय होणाऱ्या लोकांना न्याय मिळणार असल्याचा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. कोणाला पडायचं आणि कुणाला आणायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे. तर ज्यांनी उपोषणाला विरोध केला त्यांना असे पाडा की पुन्हा पाच पिढ्या उभा राहिले नाही पाहिजेत. या गेवराई मतदारसंघातून मी एकच सांगतो की आपल्याला निवडणुकीचे काही देणे घेणे नाही. मात्र ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय त्यांनी समाजाला विरोध केलाय त्यांना पाडा. बॉण्ड लिहून घ्या अथवा नका लिहून घेऊ, मात्र सर्वांचा विचार करा आणि एक गठ्ठा मतदान करा. असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं. आता सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा उपोषणासारखा हत्यार पुकारावा लागत आहे.असेही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचे सहकारी असलेले महेश दाभाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केलं. यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा