(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चार दशकं किंगमेकर ठरलेले कालिदास कोळंबकर पुन्हा निवडणुकीच्या मैदानात, जिंकणार की पडणार?
विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाला मताधिक्य मिळाल्यामुळे ही निवडणूक त्यांना थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : वडाळा मतदारसंघातून (Wadala Vidhan Sabha) विद्यामान आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) नवव्यांदा निवडणूक लढवणार आहे. जिंकणार की पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाला मताधिक्य मिळाल्यामुळे ही निवडणूक त्यांना थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे. कालिदास कोळंबकर यांनी सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे
कालिदास कोळंबकर 1990 पासून 2004 पर्यंत शिवसेनेतून कोळंबकर यांनी निवडणूक जिंकली. पहिल्याच निवडणुकीत कोळंबकर यांनी तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला तेव्हापासून त्यांनी 2019 सलग निवडून आले. पुढे 2005 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. कोळंबकर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राणे यांच्याबरोबर कोळंबकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा पोटनिवडणुकीत ते निवडून आले.
सलग आठ वेळा आमदार
त्यानंतर 2006 ते 2014 या काळात झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आणि मतदार संघावर आपले वर्चस्व राखले.2014 मध्ये मोदी लाट असताना कोळंबकर यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याविरुद्ध 800 मतांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून 2019 मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली. 2019 साली विधानसभा निवडणुकीत कोळंबकर यांना वडाळा विधानसभा मतदारसंघात 56 हजार 485 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांना केवळ 25 हजार 640 मते मिळाली होती.
कोळंबकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित
कोळंबकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मात्र यंदाची निवडणूक त्यांना थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक मुस्लीम व दलित मतदारांनी मोठ्याप्रमाणात महायुतीविरोधात मतदान केले. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लवढताना मुस्लीम आणि दलित मते आपल्या बाजूने वळवणे कठीण जाणार आहे. सोबतच या मतदारसंघात पुनर्विकासाचा मुद्दा महत्वाचा मानला जातोय. त्यातच लोकसभा निवडणुकीत वडाळा मतदारसंघात ठाकरे गटाला नऊ हजार मते अधिक मिळाली होती
कोळंबकर आपला किल्ला राखणार का?
लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना वडाळा मतदार संघातून 70 हजार 931 मतं मिळाली तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना 61 हजार 619 मतं मिळाली होती. आता ही जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे श्रद्धा जाधव या जागेवरती इच्छुक आहेत . त्यामुळे श्रद्धा जाधव विरुद्ध कालिदास कोळंबकर असा सामना होणार की भाजप आणखी काही पर्याय देणार आहे. जर कालिदास कोळंबकर यांना तिकीट मिळाली तर नव्यांदा कालिदास कोळंबकर आपला किल्ला राखणार का हे पाहणं महत्वाचं राहील.
हे ही वाचा :