मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा परंड्याचा उमेदवार बदलण्याची शक्यता, मविआत खांदेपालट होणार? राहुल मोटेंची आशा वाढली
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष परंडा या जागेसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला मिळू शकते.
धाराशीव : महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Bakasaheb Thackeay Shivsena) या पक्षाने नुकतेच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 65 उमेदवारांची नावे आहेत. मविआमध्ये आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणारा हा पहिला पक्ष आहे. दरम्यान, उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी या यादीत काही दुरुस्ती होणार असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्याबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांत बदल करणार आहेत.
परंडा जागेसाठी रणजित पाटील यांना तिकीट
सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना धाराशिव जिल्ह्यातील उमेदवार यादीत बदल होणार आहेत. जिल्ह्यातील परंडा या विधानसभा मतदारसंघासंदर्भात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या पक्षाने या जागेसाठी रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याच जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांनी आपली दावेदारी केली आहे.
राहुल मोटे यांना मिळणार तिकीट?
राहुल मोटे हे सलग तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. तसेच त्यांनी तानाजी सावंत यांच्याविरोधात निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे ते परंडा या जागेसाठी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संजय राऊत यांनी दिले होते संकेत?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी 23 ऑक्टोबरच्या रात्री पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी यादीत बदल होणार असल्याचे सूतोवाच केले होते. संजय राऊत यांच्या या स्पष्टीकरणानंतर राहुल मोटे यांची आशा पुन्हा वाढली आहे. परंडा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी आशा राहुल मोटे यांच्याकडून व्यक्त केली जा त आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून परंडा या जागेसाठी नेमकी कोणला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार