Maharashtra Election 2024 : अकोला जिल्ह्यातील दोन गावांत बॅलेटवर मॉक पोलची घोषणा; गावकरी अनभिज्ञ, प्रसिद्धी स्टंटची चर्चा
Akola: अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातल्या दोन गावांत आज 'बॅलेट'वर 'मॉक पोल'ची घोषणा करण्यात आली होती. बाळापूर मतदारसंघातल्या पातूर तालूक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार होतं.
Maharashtra Election 2024 अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातल्या दोन गावांत आज 'बॅलेट'वर 'मॉक पोल'ची घोषणा करण्यात आली होती. बाळापूर मतदारसंघातल्या पातूर तालूक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार होतं. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार प्रकाश पोहरेंनी या दोन्ही गावांत 'मॉक पोल'ची घोषणा केली होती. मात्र, घोषणा करूनही या गावात गावकऱ्यांनाही कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे बॅलेट मतदानाची कोणतीच तयारी नव्हती. त्यामूळे हा प्रसिद्धी स्टंट असल्याचं बोलले जात असून या प्रकरणाची एकच चर्चा सध्या रंगते आहे.
पोलिसांसह महसूल प्रशासनाने रात्रीपासूनच ठिय्या
सोलापुरातील मरकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील 'मॉक पोल' मोठ्या वादाचा विषय ठरला होता. अशातच अकोला जिल्ह्यातील दोन गावांसंदर्भात अशाच पद्धतीने ईव्हीएमला आव्हान देण्याची घोषणा करण्यात आली. पातुर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोहरेंकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यांच्या या घोषणेनंतर गावात पोलिसांसह महसूल प्रशासनाने रात्रीपासूनच ठिय्या दिला होता. आज या दोन्ही गावात मतदानाची कोणतीच तयारी नसल्याने मतदान झालं नाहीय.
प्रशासनाकडून सुटकेचा नि:श्वास
या दोन्ही गावात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांना आघाडी मिळालीय. आज तुळजापूर गावात दुपारी 12 ते 2 तर बेलताडा गावात दुपारी दोन ते चार या वेळेत हे मतदान होणार होतंय. यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पेट्या ठेवल्या जाणार होत्या. यात उमेदवारांच्या नावाचे बॅलेट वापरले जाणार नव्हते. तर मतदारांनी आपला आधार नंबर किंवा मतदान यादी क्रमांक लिहून बॅलेट आपलं मतदान असलेल्या तीन पैकी एका बॉक्समध्ये टाकायचं होतंय. मात्र आयोजकांनी यातल्या कोणत्या गोष्टीची गावकऱ्यांसोबत चर्चा न केल्याने हे सारं बारगळलंय.
दरम्यान, मरकडवाडीत मॉक पोल वरून मोठा वाद झाल्याने अकोल्यात जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होतीय. महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रीपासूनच गावात मुक्काम ठोकून होतेय. शेवटी मतदानच न झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडलाय.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांना थेट रक्ताने स्वाक्षरीचे पत्र
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधी जनआंदोलन मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. थेट रक्तानेच स्वाक्षरी महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महामहिम राज्यपाल यांना पत्र पाठविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश मिळालं यात ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आल्याचेही यावेळी आरोप करण्यात आला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, अशी मागणी यातून करण्यात आली.
हे ही वाचा