Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Walmik Karad in beed: वाल्मिक कराडला थोड्याचवेळात केज न्यायालयासमोर हजर केले जाईल. वाल्मिक कराडला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी, फैसला थोड्याचवेळात
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड याला मंगळवारी केज सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येईल. ही सुनावणी सुरु होण्यापूर्वी न्यायाधीशांकडून वाल्मिक कराडला, 'सीआयडी कोठडीत तुम्हाला मारहाण झाली का?', हा प्रश्न विचारतील. वाल्मिक कराड याने या प्रश्नाचे उत्तर नाही म्हणून दिले तरच पुढील प्रकियेला सुरुवात होईल.
वाल्मिक कराड याने न्यायाधीशांसमोर सीआयडी कोठडीत आपल्याला मारहाण झाली, असे सांगितले तर त्याचा वैद्यकीय अहवाल मागवला जाईल. न्यायालयात हजर करण्यापूर्वी मंगळवारी सकाळीच बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. काल सीआयडीने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले होते. आवादा कंपनीकडून घेण्यात आलेल्या खंडणीप्रकरणात कराड याचे व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले. आजच्या सुनावणीवेळी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे हे वाल्मिक कराडची बाजू न्यायालयात मांडतील.
वाल्मिक कराड यांना पोलीस कोठडीऐवजी एमसीआर करण्याची मागणी केली जाईल. ज्या मुद्द्यावर कस्टडी मागितली जात आहे ते कसे अयोग्य आहेत, हे मांडण्याचा कराडचे वकील प्रयत्न करतील. त्यानंतर कस्टडी की एमसीआर याबाबत न्यायाधीश निर्णय देतील.
वाल्मिक कराड समर्थक आक्रमक
वाल्मिक कराड याच्यावर 302 चा गुन्हा आणि मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. वाल्मिक कराड यांच्यावरील कारवाईसाठी दबाव वाढला आहे. तर दुसरीकडे आता वाल्मिक कराड याचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख प्रकरणात जातीय द्वेषातून राजकीय दबावापोटी कार्यवाही न करता निष्पक्षपणे चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा देत वाल्मिक कराडच्या समर्थकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. तर वाल्मिक कराडच्या आईकडून आज परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पुन्हा सुरुवात होत असल्याने बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू होणार आहे. जमावबंदीचे हे आदेश 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत लागू असतील.
आणखी वाचा