Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
Amit Shah: जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला संबोधित केलं. त्याचबरोबर यावेळी आमित शाहांनी उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे
मुंबई: विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सध्या राज्यात सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजप पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनाम्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित होते. जाहीरनाम्यामध्ये भाजपने अनेक वादे केले आहेत, जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला संबोधित केलं. त्याचबरोबर यावेळी आमित शाहांनी उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे, राहुल गांधींना सावरकरांबद्दल दोन शब्द चांगले बोलायला लावा, असं आव्हान देखील अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी 10 वर्षात तुम्ही काय केलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
आमित शाहांचा शरद पवारांना सवाल
अमित शाह यांनी जाहीरनामा प्रसिध्द झाल्यानंतर बोलताना शरद पवारांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करत जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांना मी विचारतो दहा वर्ष तुम्ही केंद्रात मंत्री होता. 2004 ते 2014 पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही काय केलंत ते तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगा. तुम्ही केलेली कामं जनतेसमोर मांडा, तुमच्या सरकारमध्ये दहा वर्षात महाराष्ट्रावर किती अन्याय झाला आहे ते सांगा. यावेळी अमित शाहांनी मोदी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. जेव्हा राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही काय दिलंत आणि आमची सत्ता असताना मोठा निधी आम्ही दिला आकडे समोर आहेत. महाराष्ट्राला सिंचनात ३० टक्के वाढ करण्याचा प्रयत्न केला. वैतरणा गोदावरी विकास करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पुणे नागपुरात मेट्रो विस्तार नवे टर्मिनल दिले, कोस्टल रोड पूर्ण केला, अटल सेतू निर्मिती आणि वाढवण बंदराचा निर्माणासाठी भूमिपूजन झाले. नळगंगा परियोजना, विदर्भातील भूमिका याचा फायदा होणार, पुढील १० वर्षात गोष्टी समोर दिसतील, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.
तर शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. त्यांचा उद्देश यावेळी पुर्ण होणार नसल्याचं ते म्हणाले. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे, असंही अमित शाह म्हणालेत.
उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान
तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला जनादेश दिला. नंतर 2019च्या निवडणुकीत आम्हाला कौल दिला. पण काही लोकांनी सत्तेसाठी धोका दिला. पण ते जास्त काळ टिकू शकलं नाही. आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढत आहोत. आघाडीत अंतर्गत मतभेद आहेत. मी उद्धव ठाकरे यांना विचारतो, सावरकरांबद्दल राहुल गांधीना दोन शब्द चांगले बोलायला सांगू शकाल का? काँग्रेसच्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल दोन शब्द बोलायला सांगाल का? मी उद्धव ठाकरेंना विनंती करतो., असं खुलं आव्हान अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी केलं आहे.