(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीला स्थगिती द्या; ठाकरे गटाची मागणी, सर्वोच्च न्यायालयात धाव
Legislative Council Election: विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : मुंबई : विधान परिषदेच्या (Legislative Council Election 2024) 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट (Thackeray Group) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्याची शक्यता आहे. 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे.
आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, असं असतानाही विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहे.
ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित, आज महत्त्वाची बैठक
सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणं, हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांचं प्रतिज्ञापत्र जी सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत, त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज (गुरुवारी) बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीनं या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 2 जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 3 जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 5 जुलैपर्यंत मागे घेता येईल. 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. 12 जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.