(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना शिंदेंचीच, राष्ट्रवादी अजितदादांची... खरा बॉस कोण? निवडणुकीच्या निकालानंतर चित्र काय?
Maharashtra Assembly Election Result : खरी शिवसेना कुणाची आणि खरी राष्ट्रवादी कुणाची हा मुद्दा या निकालाच्या निमित्ताने लोकांच्या कलाने स्पष्ट झाल्याचं दिसतंय.
मुंबई : 2019 च्या विधासभा निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक ही काहीसी वेगळी होती. कारण राज्यातल्या दोन मोठ्या पक्षांची यावेळी दोन शकलं झाली. ते दोन पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी. शिवसेनेचे दोन भाग होऊन ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे दोन गट पडले. तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट. निवडणुकीआधी आपलाच खरा पक्ष असं या दोन्ही पक्षातल्या दोन्ही गटांचं म्हणणं होतं. त्याच आधारावर निवडणुका झाल्या.
बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय वारशांवरुन गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या याच संघर्षातील सर्वात मोठा अंक आता संपलाय. कारण ज्या आमदारांच्या जोरावर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा ठोकला होता तोच आकडा पुन्हा एकदा मिळवत एकनाथ शिंदेंनी आपणच खरी शिवसेना आहोत हा सिद्ध केलंय.
शिवसेनेत बंड आणि जनतेचा कौल
गेल्या पाच वर्षांमधील सर्वात मोठा राजकीय भूकंप होता तो एकनाथ शिंदेंचं बंड. त्यानंतर दुसरा भूकंप म्हणजे देवेंद्र फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद. असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवरचा दावा काही सोडला नव्हता. सर्वोच्च न्यायालयापासून ते विधिमंडळापर्यंत झालेल्या सगळ्या राजकीय महानाट्यानंतर एकनाथ शिंदेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निकाल विविध पातळ्यांवर आला होता.
पण, तरीही उद्धव ठाकरेंनी आपला दावा सोडला नव्हता. जनताच ठरवेल की खरी शिवसेना कोणाची असा प्रचार त्यांनी केला. नाव चोरलं, पक्ष चोरला, कोर्टाकडून काही आशा नाही. म्हणून मी जनतेच्या कोर्टात आलोय असं ते म्हणायचे.
आता निकाल लागला आणि शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं 57 जागांवर झेंडा फडकवलाय. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मात्र 20 वर घसरलीय. मतांचा विचार केला तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 78 लाख 82 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला 64 लाखावरच मतं मिळाली. असं असलं तरी ठाकरेंनी निकालावर संशय व्यक्त केला. तर खासदार संजय राऊतांनी निकालात घोळ असल्याचं संशय व्यक्त केला.
आता हा संघर्ष पुढे कैक वर्ष सुरुच राहणार. पण, तूर्तास तरी शिवसेना शिंदेंचीच हे या निकालानं स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादी अजितदादांचीच
अशा आणखी एका पक्षासंदर्भात निकाल लागला आणि तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवारांची साथ सोडत, एकनाथ शिंदेचाच पॅटर्न फॉलो करत अजित पवार महायुतीत सामील झाले आणि राष्ट्रवादीवर दावा ठोकला. इतकंच नाही तर नवा लूकही केला. लाडका दादा म्हणत अजित पवारांनी विधानसभेचा प्रचार दणक्यात केला.
तिकडे शरद पवारांनीही पायाला भिंगरी लावून प्रचार केला आणि दादांविरोधात घरातूनच आव्हान दिलं. दादा विरुद्ध अवघं पवार कुटुंब असा संघर्षही उभा राहिला. लोकसभेत दादांचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा खराब राहिला. दादांची घरवापसी होणार अशा चर्चाही सुरु झाल्या. पण, दादांनी शांत राहत फक्त आणि फक्त प्रचारावर फोकस केला. याचाच फायदा अजित पवारांना झाला.
आकड्याचंच बोलयाचं झालं तर दादांच्या राष्ट्रवादीला 40 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागा मिळाल्यात. असं असलं तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेली मतं ही दादांच्या राष्ट्रवादीपेक्षा जवळपास लाखांहून जास्त असल्याचं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नोंद करण्यात आलं आहे. त्यामुळे जागांचं समाधान नसलं तरी व्होटशेअर शरद पवारांच्या सोबत आहे हे काय ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीचं समाधान.
मात्र, असं असलं तरी आताच्या महानिकालानं दोन प्रश्नांची उत्तर काही प्रमाणात का होईना स्पष्ट झाली ती म्हणजे शिवेसना शिंदेंचीच.. आणि राष्ट्रवादी अजितदादांचीच.