विरोधी पक्षांचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, नाना पटोलेंचं नाव घेताच सर्व आमदार बाहेर पडले, नेमकं कारण काय?
Shivsena UBT and NCPSP MLA : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नाना पटोलेंचं नाव शपथविधीसाठी घेताच बाहेर पडले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. विरोधी पक्षांचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले आणि थेट विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जात त्यांना अभिवादन केलं. महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे आमदार आज शपथ घेणार नाहीत. भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
भास्कर जाधव यांनी याबाबत म्हटलं की आमचा शपथेला विरोध नाही. आमचा या सरकारला पाशवी बहुमत मिळालं आहे, जवळपास 90 टक्के बहुमत मिळालं आहे, हे देशात यापूर्वी कधी घडलेलं नाही. ही जादू इव्हीएमची आहे. सरकारचा निषेध करुन आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतलाय,असं भास्कर जाधव म्हणाले. या सरकारला पाशवी बहुमत मिळालं हा जनतेचा जनाधार नाही, ती इव्हीएमची किमया आहे. लोकशाही वाचवायची असेल तर लोकशाही मार्गानं निषेध करणं गरजेचं आहे. विद्यमान सरकार ज्यापद्धतीनं सत्तेवर आलं त्याचा निषेध करत आहोत. आज शपथ घेणार नाही पण घेणारचं नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.
विरोधकांना बोलू न देणं, त्यांना दाबून ठेवणं, वेळ आलीच तर तुरुंगात टाकणं हे पुतिनचं काम आहे. अजित पवारांचा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. मी इन्कम टॅक्सवर बोलून काही फरक पडणार आहे. भाजपवर काय फरक पडणार आहे का? त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर काय फरक पडणार आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीच्या आमदारांची थोड्यच वेळात बैठक होणार आहे, अशी माहिती आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक सुरु आहे. या बैठकीत शपथविधीबाबत निर्णय होईल. भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, नितीन देशमुख, संदीप क्षीरसागर यांच्यासह विरोधी पक्षांचे आमदार बैठकीला उपस्थित आहेत.
काँग्रेस नेते नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. नाना पटोले अंबादास दानवे यांच्या दालनात पोहोचले असून या बैठकीत महाविकास आघाडीची पुढील रणनीती ठरवली जाईल.
दरम्यान, एकीकडे विरोधी पक्षांचे आमदार बाहेर पडले असले तरी विधानसभेत सत्ताधारी आमदारांची शपथ घेणं सुरु आहे.
इतर बातम्या :