Maharashtra Assembly Elections 2024 : सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. आपले नाव ज्या मतदान केंद्रांच्या मतदार यादीत आहे त्या ठिकाणी आपण समक्ष जाऊन मतदान करू शकतो. मात्र, देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सेना दलाच्या जवानांना (Indian Army) सुद्धा मतदान (Voting) करता येते. सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घेऊयात.
सैनिक मतदार कर्तव्यासाठी देशाच्या सीमेवर असल्याने भारत निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी मतदानाची स्वतंत्र तरतूद केलेली आहे. यामुळे सैनिक मतदार मतदानापासून वंचित राहत नाहीत. ते घर, गावापासून दूर कार्यरत असले तरी त्यांना टपाली मतपत्रिकेच्या सहाय्याने मतदान करता येते. नाशिक जिल्ह्यात एकूण 8,811 सैनिक मतदार इटीपीबीएमएस (ETPBMS) प्रणालीद्वारे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी दिली आहे.
सैनिक मतदारांची मतदार नोंदणी
मतदान करण्यासाठी सेनादलातील मतदारांना मतदार म्हणून नोंदणी करावी लागते. सेनादलाचे जवान उदा. आसाम रायफल्स, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, जीआरईएफ, बॅार्डर रोड ऑर्गनायझेशन, सीआयएसएफ आदी विभागातील जवान मतदार नोंदणीचा विहीत नमुना अर्ज 2 भरून नोंदणी करतात. निवडणूक आयोगाने यासाठी सर्व्हिस व्होटर पोर्टल विकसित केले असून देशाच्या कोणत्याही भागात कर्तव्यावर असलेले सैनिक त्यांच्या रेकॅार्ड ऑफिसच्या माध्यमातून मतदार नोंदणीचा अर्ज त्यांचे मूळ गाव ज्या मतदारसंघात आहे त्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन पाठवितात. सैनिक मतदारांकडून प्राप्त झालेले अर्ज तपासून मतदार नोंदणी अधिकारी अर्ज स्वीकृत करून घेतात. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा शेवटचा मतदार यादी भाग सेना दलातील मतदारांसाठी असतो. मतदार नोंदणी अधिकारी सेना दलातील मतदाराचे नाव समाविष्ट करून घेतात. ही सगळी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सर्व्हिस व्होटर पोर्टलचे माध्यमातून ऑनलाईन होत असते.
सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात?
सेना दलातील मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी त्यांना आयोगाने विकसित केलेल्या इटीपीबीएमएस (ETPBMS) प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन मतपत्रिका पाठविण्यात येते. या प्रणालीमुळे देशाच्या कोणत्याही भागात कार्यरत असलेल्या सैनिकांपर्यंत मतपत्रिका क्षणार्धात पोहोचते. सैनिक मतदार आपल्या लॅाग इनद्वारे आलेल्या मतपत्रिकेची प्रिंट घेऊन त्यांच्या रेकॅार्ड ऑफिसमध्ये आयोगाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या मतदान कक्षात मतदान करतात.
मतदान झाल्यावर यासाठी विशिष्टरित्या तयार केलेल्या पाकिटातून पोस्टाद्वारे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतपत्रिका पाठवतात. या पोस्टेजचा खर्च भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात येतो. सेना दलातील मतदारांनी मतदान करण्याची प्रक्रिया त्यांच्या रेकॅार्ड ऑफिसमध्ये आयोगाच्या निर्देशानुसार पूर्ण करण्यात येते. सेनादलातील मतदारांकडून यानुसार प्राप्त मतपत्रिकेचे पाकीट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पोस्ट विभागाकडून पोहोच करण्यात येते. मतमोजणीच्या दिवशी या टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक अधिकारी करतात. सेनादलातील मतदार टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून देश रक्षणाचे कर्तव्य पार पाडण्याबरोबरच मतदानाचे कर्तव्य देखील पार पाडत असतात.
आणखी वाचा