महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कुणाला किती जागा? न्यूज अरेना या ट्वीटर हँडलवरील भाकीत व्हायरल
सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35%, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 21%, सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना 14%, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12%, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 9% मतदारांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई : News Arena India या ट्वीटर हँडलने महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कसे निकाल लागतील, याचा अंदाज वर्तवला आहे. या ट्वीटर हँडलच्या दाव्यानुसार, भाजपला 123 ते 129 शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फक्त 17 ते 19 आणि इतर तसंच अपक्ष उमेदवारांना 12 जागा मिळतील असं भाकीत करण्यात आलंय. शनिवार 17 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रकाशित झालेल्या या ट्वीटला आतापर्यंत चारशेपेक्षा जास्त रिट्वीट, 19 कोट रिप्लाय आणि अडीच हजारांच्या जवळपास लाईक्स आहेत.
हे ट्वीटर हँडल कुणाचं आहे किंवा त्यांनी कधी कुठे सर्वेक्षण केलं याची मेथडॉलॉजी या ट्वीटसोबत देण्यात आली नसली तरी, त्यांनी या सर्वेक्षणातील निष्कर्ष ही ट्वीटमध्येच प्रकाशित केले आहेत. त्यानुसार, आगामी निवडणुकीत भाजपला आजवरच्या सर्वाधिक जागा मिळतील असं भाकीत वर्तवण्यात आलंय. मतदानाची वेळ जसजशी जवळ येईल तोपर्यंत अपक्ष किंवा इतर उमेदवारांचा आकडा वाढू शकतो, असंही निरीक्षण या ट्वीटर हँडलने वर्तवलंय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळतील, तसंच त्या फक्त कोकणातच नाही तर सर्व महाराष्ट्रातून त्यांचे आमदार निवडून येतील असा निष्कर्षही न्यूज अरेना इंडिया या ट्वीटर हँडलच्या कथित सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
हा कथित सर्वे कुणी आणि कधी केला, त्यासाठी सँपल साईज किती याचीही माहिती अजून सार्वजनिक करण्यात आलेली नाही, फक्त पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे ट्वीटर हँडलवर प्रकाशित झालेल्या अंदाजाचं आमच्या वाचकांसाठी वृत्तांकन करणं एवढाच आमचा प्रयत्न आहे.
या ट्वीटमधील आणखी एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे, आगामी निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाईल, असा अंदाज वर्तवताना भाजप आपल्यासोबत अपक्ष-इतर आमदारांना सोबत घेऊन 140 आसपास संख्याबळ वाढवेल असं स्पष्ट करण्यात आलंय. म्हणजेच या ट्वीटर हँडलच्या मतानुसार, आगामी निवडणुकीनंतर भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेणार नाही.
Maharashtra Assembly Prediction as on date -
— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023
BJP : 123-129
SS : 25
NCP : 55-56
INC : 50-53
SS(UBT) : 17-19
OTH : 12
Findings -
➡️ BJP will reach its highest ever tally in Maharashtra.
➡️ No of Others will go up as voting day will approach.
➡️ Eknath Shinde’s Shiv Sena will… pic.twitter.com/zePs0kYqmu
भाजपला स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारांमुळे तब्बल 35 टक्के जागा मिळू शकतात, असं या ट्वीटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. असाच निष्कर्ष काँग्रेस उमेदवारांच्या बातमीतही न्यूज अरेनाने काढला आहे. काँग्रेसला काही मतदारसंघातील मजबूत उमेदवारांचा फायदा होईल, त्याचं यश हे व्यक्तीगतरित्या त्या स्थआनिक उमेदवाराचं असेल, पक्षाचं नाही. असं या ट्वीटर हँडलने म्हटलंय.
हैदराबादच्या AIMIM या पक्षाने राज्यात आता चांगलीच पाळेमुळे रोवलीत, 2014 ला पहिल्याच निवडणुकीत दोन आमदार आणि 2019 च्या निवडणुकीत एक खासदार आणि दोन आमदार असं संख्याबळ कमावणाऱ्या एमआयएमला आगामी निवडणुकीत एकाही जागेवर यश मिळणार नाही असा दावाही करण्यात आलाय. न्यूज अरेनाच्या मते, एमआयएमला यावेळी एकाही जागेवर यश मिळणार नाही कारण, राज्यातील मुस्लीम मतदार महाविकास आघाडीसोबत आहेत, असा दावाही या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या जागा वाढतील, असं भाकीत वर्तवत असतानाच महाविकास आघाडी बहुमताच्या जवळपासही जाणार नाही, असा न्यूज अरेनाचा निष्कर्ष आहे. उद्वव ठाकरे यांना कोकणाबाहेर फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. महाविकास आघाडीचा काँग्रेसला सर्वाधिक फायदा होईल असाही निष्कर्ष काढण्यात आलाय. तसंच महाविकास आघाडीतून बाहेर पडून काँग्रेसने निवडणूक लढवली तर जेमतेम 28 जागा मिळतील असा दावाही या ट्वीटमध्ये करण्यात आलाय.
मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती?
न्यूज अरेनाच्या या कथित सर्वेक्षणानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत कोणआला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी राज्यातील मतदारांची कोणाला सर्वाधिक पसंती आहे, याचीही माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आलीय. त्यानुसार, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35%, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 21%, सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना 14%, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12%, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 9% मतदारांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे.