Kurla Assembly Seat : कुर्ला विधानसभेची लढत ठरली, ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर रिंगणात, शिंदेंकडून मंगेश कुडाळकर लढणार
Kurla Assembly Election 2024 : कुर्ला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Kurla Assembly Election 2024 मुंबई: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी जवळपास 40 जणांना एबी फॉर्मचं वाटप केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुर्ला विधानसभा मतदारसंघ कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर कुर्ला विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार असेल. उद्धव ठाकरे यांनी प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळं कुर्ला विधानसभा निवडणुकीत प्रविणा मोरजकर विरुद्ध मंगेश कुडाळकर यांच्यात लढत पाहायला मिळेल.
कुर्ला विधानसभा मतदारसंघ ठाकरे यांच्याकडेच
कुर्ला विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कुर्ला विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे लढणार आहेत. या जागेवरुन प्रविणा मोरजकर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार असणार आहेत. यामुळं या ठिकाणी प्रविणा मोरजकर विरुद्ध मंगेश कुडाळकर असा होईल. प्रविणा मोरजकर यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेच्या नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. कुर्ला विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना आघाडी मिळाली होती. भाजपचे उज्ज्वल निकम पिछाडीवर राहिले होते. वर्षा गायकवाड यांना 67620 मतं मिळाली होती. तर, निकम यांना 51328 मतं मिळाली होती.
शिवसेना पक्षात ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळी मंगेश कुडाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता कुर्ला विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मविआचं जागा वाटप अंतिम टप्प्यात
उद्धव ठाकरे यांच्याकडून आतापर्यंत विविध मतदारसंघातील 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अजूनही महाविकास आघाडीमध्ये 5 जागांबाबत अंतिम निर्णय झाला नसून त्या जागांबाबतचा निर्णय हायकमांड घेईल, असं विधानसभेची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीचं जागावाटप आज निश्चित होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा तीन पक्षांकडून पत्रकार परिषद घेऊन केली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी अंतिम निर्णय कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. काल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात येत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 29 ऑक्टोबरपर्यंत आहे.
इतर बातम्या :