शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे. माफी मागण्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अजित पवारांच्या पक्षाला घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी शरद पवारांकडून करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी वेळी शरद पवारांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अमोल मिटकरी यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरील पोस्टचा दाखला देत युक्तिवाद केला होता. अमोल मिटकरींच्या पोस्टमुळं अजित पवार यांच्यासमोर सुनावणीमध्ये अडचण निर्माण झाली. अखेर, अमोल मिटकरी यांनी काल पोस्ट केलेला शरद पवारांचा व्हिडीओ करत साहेब असं कॅप्शन दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर अमोल मिटकरी यांनी पोस्ट डिलीट केली आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाची माफी देखील मागितली आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
अमोल मिटकरी यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अनावधानाने माझ्या सोशल मीडिया टीमकडून एक व्हिडीओ ट्विट झाला. त्याचा अन्वयार्थ काढून आज सुप्रीम कोर्टासमोर वेगळ्या प्रकारे युक्तिवाद केला गेला. संबंधित व्हिडिओ डिलीट करून मी अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल मी मा.सुप्रीम कोर्टाची माफी मागतो.
अमोल मिटकरी यांच्या पोस्टमध्ये काय होतं?
अमोल मिटकरी यांच्या एक्स या प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवर शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्या पोस्टला कॅप्शन साहेब असं देण्यात आलं होतं. त्या व्हिडीओत शरद पवार अजित पवारांचं कौतुक करत असल्याचा तो व्हिडीओ होता.
अमोल मिटकरी यांच्या पोस्टचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत करण्यात आला. अभिषेक मनू सिंघवी यांनी अमोल मिटकरींच्या पोस्टवरुन युक्तिवाद केला. अजित पवारांच्या गटाकडून स्वतःची स्वतःला विरोधाभासी भूमिका मांडली जात आहे, असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.त्यांना शरद पवारांचे गुडविल वापरायचं आहे . अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे , त्यात शरद पवारांचा उल्लेख आहे, असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयानं यानंतर अजित पवार यांच्या पक्षाला निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवारांना निर्देश इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढण्याचे आदेश दिले. तुमचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ यांचे फोटो वापरु नका याच्या सूचना द्या, असं न्यायालयानं सांगितलं. जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत तर तुम्ही तूमच्या पायावर उभं राहिल पाहिजे ना, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं.
काही दिवसांपूर्वी अनावधानाने माझ्या सोशल मीडिया टीमकडून एक vdo ट्विट झाला. त्याचा अन्वयार्थ काढून आज सुप्रीम कोर्टासमोर वेगळ्या प्रकारे युक्तिवाद केल्या गेला. संबंधित व्हिडिओ डिलीट करून मी अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल मी मा.सुप्रीम कोर्टाची माफी मगतो.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 13, 2024
इतर बातम्या :