Jintur Assembly Election 2024 Result : जिंतूर विधानसभेत भाजपाचा बोलबाला, मेघना बोर्डीकर विजयी, विजय भांबळेंचं स्वप्न अधुरेच!
Maharashtra Jintur Assembly Election Result 2024: परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती
परभणी : जिल्ह्यात यावेळची विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024 Result ) चांगलीच चुरशीची ठऱली. या जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या चार मतदारसंघांपैकी जिंतूर या मतदारसंघाकडे (Jintur Vidhan Sabha Constituency Election 2024 Result) जिल्ह्याचे तसेच समस्त राज्याचे लक्ष लागले होते. कारण या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेतेमंडळी प्रयत्न करत होते. तिकीट मिळावे म्हणून नेते मंडळी वरिष्ठांना भेटत होते. असे असले तरी जिंतूर विधानसभेत भांबळे (Vijay Bhamble) विरुद्ध बोर्डकर (Meghana Bordikar) अशी लढत झाली.
2024 सालच्या निवडणुकीत कोणाचा विजय?
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे आणि भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांच्यात थेट लढत झाली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत या दोन्ही नेत्यांत चुरस रंगली होती. मात्र शेवटी या जागेवर भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांनीच बाजी मारली. 2019 सालच्या निवडणुकीतही याच दोन नेत्यांत लढत झाली होती. यावेळीदेखील विजय भांबळे यांचे आमदार होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
2019 सालच्या निवडणुकीत काय झालं होतं?
परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. कारण येथे भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यातून विस्तवही जात नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या मेघना साकोरे बोर्डीकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. 2019 सालच्या निवडणुकीत मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत विजय भांबळे यांचा मेघना बोर्डीकर यांनी अवघ्या 3717 मतांनी पराभव करत पहिल्यांदाच विजय मिळवला होता. मेघना बोर्डीकर यांना 1 लाख 16 हजार 913 मते तर विजय भांबळे यांना 1 लाख 13 हजार 196 मते पडली होती. या निवडणुकीत वंचितचे मनोहर वाकळे यांना 13 हजार 172 मते मिळाली होती.
यावेळी नेमकं काय घडलं?
यावेळच्या निवडणुकीतही मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यातच लढत झाली. मात्र या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश नागरे यांनीही कंबर कसली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या जागेवर दावा केला होता. विशेष म्हणजे त्यांनी जोरदार प्रचारदेखील केला होता. महाविकास आघाडीकडून ही जागा नेमकी कोणाला सुटणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेवटी ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली आणि विजय भांबळे यांना तिकीट देण्यात आले.
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं?
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील जनता शिवसेनेचे (संयुक्त) उमेदवार संजय जाधव यांच्या मागे उभी राहिली होती. या निवडणुकीत संजय जाधव यांना 103247 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे (संयुक्त) उमेदवार राजेश विटेकर यांना तेव्हा 79290 मते मिळाली होती. मतांचे हे प्रमाण अनुक्रमे 47 टक्के आणि 36.1 होते. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवर आलमगीर खान हे होते. त्यांना 26079 मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या या मतांचे प्रमाण 11.9 टक्के होते.
हेही वाचा :