(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसचा बडा नेता अन् माजी मंत्री वंचितच्या गळाला; प्रकाश आंबेडकरांकडून मध्य नागपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस बडे नेते माजी मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव अनिस अहमद (Anis Ahmad) यांनी काँग्रेसची साथ सोडत वेगळा मार्ग निवडला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. काँग्रेस बडे नेते माजी मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (All India Congress Committee) चे राष्ट्रीय सचिव अनिस अहमद (Anis Ahmad) यांनी काँग्रेसची साथ सोडत वेगळा मार्ग निवडला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनिस अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्याचा पवित्रा घेतला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत ते राजगृह येथे थोड्याच वेळात वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान अनिस अहमद यांना वंचितकडून मध्य नागपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणाही केली जाणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसचा बडा नेता अन् माजी मंत्री वंचितच्या गळाला लागल्याने वंचितची ताकद आता वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसवर नाराजी, वंचितकडून मध्य नागपुरातून उमेदवारी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिस अहमद हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज होते. दरम्यान त्यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली आहे. मुस्लिम समुदाय 99% काँग्रेसला (Congress) मत देतो, मात्र काँग्रेस मुस्लिमांना त्यांचे हक्क देत नाही. लोकसभेत महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्या गेली नाही. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही काँग्रेसने मुस्लिमांना इग्नोर केलंय. त्यामुळे मुस्लिम समाज नाराज असून आता त्यांना त्यांचा हक्क हवाय. मुस्लिम मतदारांची ही बाब पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आम्ही सर्व आजी-माजी मुस्लिम नेत्यांनी सांगितली आहे. अशी मत व्यक्त करत काँग्रेस नेते अनिस अहमद (Anis Ahmad) यांनी एबीपी माझाकडे एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देत आपली भावना व्यक्त केली होती. दरम्यान आज त्यांनी अखेर काँग्रेसला रामराम करत वंचितची वाट निवडली आहे.
अनिस अहमद आमचे ज्येष्ठ नेते, ते असं करणार नाही- नाना पटोले
दरम्यान, याच मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, अनिस अहमद आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते असं काही करणर नाहीत. सर्वच समाजाला नेतृत्व मिळावा अशी काँग्रेस आणि राहुल गांधी यांची इच्छा आहे. मात्र अलायन्स मध्ये लढल्यामुळ काही ठिकाणी आम्हाला ते करता आलं नाही. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका राहुल गांधींनी मांडली आहे. विशेष करून महाराष्ट्रात भाजपने जी महाराष्ट्राची संस्कृती खराब केली आहे, त्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर, गोवारी विरुद्ध आदिवासी हे जे काही फूट पाडली आहे, त्यासाठी जातीय जनगणना हे पहिलं प्राधान्य राहणार आहे. समाजाला न्याय कसा देण्यात येईल, हीच भूमिका काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे राहणार आहे. असेही नाना पटोले म्हणाले.
हे ही वाचा