शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघ | कॉंग्रेस आणि भाजपात होणार काटे की टक्कर?
राष्ट्रवादीचे राजेंद्रकुमार गावित बंडखोरी करतात की नाही हे पाहणे महत्वाचे राहील. या भागात माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात यावर मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.
नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकीय समीकरणाची दिशा ठरवणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ. 2009 च्या मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आधी हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी होता. मात्र त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव झाला. दिवंगत पी के अण्णा पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.
2014 विधानसभा निवडणुकीत पद्माकर वळवी यांचा आवघ्या 700 मतांनी निसटता पराभव या मतदारसंघातून झाला. भाजपचे उदेसिंग पाडवी विजयी झाले आहेत. मात्र आता या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलत आहेत. या मतदारसंघात ज्या प्रमाणे आदिवासी मतदारांची संख्या जशी महत्वपूर्ण आहे. त्याच प्रमाणे खुल्या प्रवर्गातील मतदार या मतदारसंघात निर्णयक आहेत. नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी आणि शैक्षणिक संस्था व सहकार चळवळीचे केंद्र म्हणून ओळख असणाऱ्या ठिकाणी यावेळेस तिरंगी लढत पाहायला मिळू शकते, ती आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शहराचा विकास झालेला असला तरी या मतदारसंघात अनेक समस्या आहेत त्या अजूनही सुटल्या नसल्याचे शैल्य शहादा तळोदा वासियांना आहे. मतदारसंघातील राजकीय स्थिती
शहादा-तळोदा मतदारसंघात शहादा आणि तळोदा या दोन तालुक्याचा समावेश आहे. पराभवानंतर माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी या मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला आहे. आदिवासींच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपातील नेते डॉ. विजयकुमार गावित आणि आमदार उदेसिंग पाडवी यांच्यात बेबनाव आहे. तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठे प्रस्थ असलेले कॉंग्रेस नेते दीपक पाटील भाजपच्या संपर्कात असून लवकर ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा या मतदारसंघात जोरात आहे. तर हा मतदार संघ आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला आला होता. डॉ विजयकुमार गावित यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी ही या मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत ते आघाडी सोबत असले तरी त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपासोबत असल्याचे उघड गुपित आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस या मतदारसंघावर दावा सांगेल आणि त्यातून आघाडीत बिघाडी होऊ शकते. मात्र पक्षांतराचे वारे या मतदारसंघात जोरात वाहत असल्याचे चित्र आहे.
शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार (लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार )
एकूण मतदार - 3 लाख 13 हजार 546 पुरुष मतदार - 1 लाख 58 हजार 423 स्त्री मतदार - 1 लाख 55 हजार 119
2014 विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेलं उदेसिंग पदवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा पराभव करत अत्यंत कमी मतांनी विजयी मिळवला. यावेळी शिवसेना, भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या, त्याचा फटका बसला होता. मात्र गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काही अंशी बदलली आहे. यासोबत नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या जास्त आहे. नवीन मतदार कुणाच्या पारड्यात आपली मतं टाकणार हे देखील निर्णायक असणार आहे.
2014 विधान सभा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
- उदेसिंग पाडवी (भाजपा ) 58 हजार 556
- पद्माकर वळवी (कॉंग्रेस ) 57 हजार 837
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला निर्णायक आघाडी घेता आली नसल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केल्याने भाजपा पुढे मोठे आव्हान उभे केले होते. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने एक संघ लढा दिल्याची स्थिती होती. उलट डॉ. विजयकुमार गावित यांचे समर्थक यांनी भाजपचे काम केल्याने काही अंशी या मतदारसंघात राष्ट्रवादीची मदत भाजपला झाल्याचे चित्र होते. आमदार उदेसिंग पाडवी यांनी पक्षासाठी ग्रामीण भाग पिंजून काढला होता. मात्र त्यांना निर्णयक अशी आघाडी मिळू शकली नाही.
लोकसभा निवडणुकीत शहादा विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते
- के .सी .पाडवी (कॉंग्रेस ) 1 लाख 01 हजार 199
- डॉ. हीना गावित (भाजपा ) 1 लाख 02 हजार 876
डॉ. हीना गावित यांना शहादा विधानसभा मतदारसंघातून 1677 मतांची आघाडी मिळाली होती. या मतदारसंघात भाजपने आपली ताकद वाढवली आहे. शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मोतीलाल पाटील विजयी झाले होते. मात्र या नगरपालिकेत कॉंग्रेसला बहुमत मिळाले. तर तळोदा नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. मात्र ग्रामीण भागात कॉंग्रेसने आपली पकड मजबूत केली आहे. शहादा तालुक्यातील कॉंग्रेस नेते दीपक पाटील आणि मोतीलाल तात्या पाटील हे दोघे गट कधी एकत्र काम करत नाही. राजकारणातील त्यांचे हाडवैर संपूर्ण जिल्हा जाणून आहे. दीपक पाटील यांनी भाजपात प्रवेश केला, तर मोतीलाल पाटील यांचा गट भाजपची साथ सोडेल असे चित्र या मतदारसंघात पाहण्यास मिळू शकते.
या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार
- पद्माकर वळवी (काँग्रेस)
- राजेंद्र गावित (राष्ट्रवादी)
- उदेसिंग पाडवी (भाजप)
- किसन पवार, झेलसिंग पावरा (अपक्ष)
मतदार संघातील प्रमुख समस्या
- या भागात तापी नदीवरील बॅरेज आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात पाणी अडवले जाते, मात्र सिंचनाच्या सुविधाचा अभाव आहे.
- रोजगाराचा अभाव असल्याने रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते.
- ग्रामीण भागात रस्त्याची दुरावस्था आहे.
- आरोग्य सुविधेचा उडालेला बोजवारा आहे.
- ग्रामीण भागात दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई.
या मतदार संघात कॉंग्रेस आणि भाजपात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मात्र राष्ट्रवादीचे राजेंद्रकुमार गावित बंडखोरी करतात की नाही हे पाहणे महत्वाचे राहील. या भागात माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात यावर मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.