अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ | हजार मतांनी पराभूत झालेले नवाब मलिक कमबॅक करणार?
दलित आणि अल्पसंख्यांकांचं या मतदारसंघात प्राबल्य असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र 2014 ला शिवसेनेच्या तुकाराम कातेंकडून अवघ्या 1007 मतांनी नवाब मलिक यांचा निसटता पराभव झाला. यामुळे राष्ट्रवादीची मुंबईतून मोठी पिछेहाट झाली.
मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची ओळखच त्याच्या नावाने होते. देशातील अणुप्रकल्पांपैकी एक म्हणजे भाभा अणुऊर्जा केंद्र हा अणुशक्ती विधानसभा मतदारसंघात येतो आणि त्यामुळेच हा अत्यंत संवेदनशील परिसर मानला जातो.
विज्ञान आणि अज्ञानाचा विरोधाभास
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात भाभा अणुऊर्जा केंद्र आणि वैज्ञानिकांची सर्वात मोठी वसाहत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील BARC कॉलनी अतिशय सुनियोजित आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील अशी मानली जाते. मात्र त्याच मतदारसंघाच्या उर्वरित भागात पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि राहण्यासाठी पक्की घरे अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा विरोधाभास आढळून येतो. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) सारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेचा अपवाद वगळता याठिकाणी शाळा, महाविद्यालये आणि हॉस्पिटल्सचाही वानवा आहे. त्यामुळे लाल डोंगर, चिता कॅम्प, मंडाळा गाव, गणेश नगर, वाशी नाका या परिसरात तरुणांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढीला लागलं आहे. इथले बहुसंख्य तरुण एकतर अमली पदार्थांच्या विळख्यात किंवा गुन्हेगारीच्या दलदलीत अडकल्याचे दिसून येते. वाढत्या झोपडपट्ट्यांचं साम्राज्य आणि डोंगरावरच्या अतिक्रमणामुळे या परिसरात असलेल्या कांदळवन आणि पर्यावरणाचीही मोठी हानी झाली आहे.
मेट्रो कारशेडवरुन राजकारण
मानखुर्दमध्ये मेट्रो कारशेडचं काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे रस्त्यावरचे खड्डे, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणामुळे महाराष्ट्र नगरचे नागरिक त्रस्त आहेत. याविरोधात स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी सत्तेत असून सरकारविरोधात आक्रमक आंदोलने केली. मात्र काते यांनी मेट्रोच्या खोदकामातून निघणाऱ्या डेब्रिजमध्ये एका ट्रक मागे 300 रुपयांच्या हप्त्याची मागणी करत असल्याचा आरोप तिथल्या कंत्राटदार आणि विरोधकांनी केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेससाठी मुंबईत अस्तित्वाची लढाई
2019 ला सीमांकनामुळे ट्रॉम्बे आणि चेंबूर या दोन मतदारसंघातून अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ तयार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना 2009 ला दणदणीत विजय मिळाला. दलित आणि अल्पसंख्यांकांचं या मतदारसंघात प्राबल्य असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र 2014 ला शिवसेनेच्या तुकाराम कातेंकडून अवघ्या 1007 मतांनी मलिक यांचा निसटता पराभव झाला. यामुळे राष्ट्रवादीची मुंबईतून मोठी पिछेहाट झाली.
मात्र 2019 च्या तयारीसाठी नवाब मलिक यांनी पुन्हा कंबर कसली आहे. बोगस मतदारांचा शोध घेण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लावली आहे. यामुळे तब्बल 1 लाख 10 हजार बोगस मतदारांची यादी मलिक यांनी निवडणूक आयोगाकडे छाननीसाठी पाठवली आहे. त्यामुळे हजार मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागलेल्या मलिक यांना कमबॅक करण्याची संधी दिसत आहे. याशिवाय भाजपचे नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी 2014 साली 23 हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर चांगली लढत दिली होती. त्यामुळे यंदा शिवसेना-भाजप युती झाल्यास त्याचा मोठा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या मतदारसंघात 2014 ला शिवसेनेने भगवा फडकवला. त्यामुळे मागच्या निसटत्या पराभवानंतर यंदा राष्ट्रवादी-काँग्रेस आणि शिवसेनेत इथं काटे की टक्कर पाहायला मिळू शकते.
विधानसभा निवडणूक 2014 मतदानाची आकडेवारी
- तुकाराम काते (शिवसेना) - 39,966
- नवाब मलिक (राष्ट्रवादी) - 38,959
- विठ्ठल खरटमोल (भाजप) - 23,767
- राजेंद्र माहुलकर (काँग्रेस) - 17,615