Sharad Pawar: 'काय पुळका आलाय…', प्रतिभा काकींच्या प्रचाराबाबत अजितदादांचा प्रश्न, शरद पवारांनी दिलं उत्तर म्हणाले, 'त्या सर्वांच्या प्रचारासाठी...'
Sharad Pawar: आज गावभेट दौऱ्यावर असताना अजित पवारांनी काकींच्या प्रचारावर बोलत 'काय नातवाचा पुळका आलाय कळेना', असं म्हटलं त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे: लोकसभेप्रमाणेच आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सर्वाधिक चर्चा आणि लक्ष्य लागलं आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा पवार विरूद्ध पवार असा निवडणुकीचा सामना होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात आहेत. एकीकडे अजित पवार त्यांची दोन मुलं आणि पत्नी त्यांचा बारामतीमध्ये प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांचा प्रचार करण्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, त्यांच्या आई शर्मिला पवार आणि वडिल श्रीनिवास पवार यांच्यासह शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसत आहेत, त्यावरून आज गावभेट दौऱ्यावर असताना अजित पवारांनी काकींच्या प्रचारावर बोलत 'काय नातवाचा पुळका आलाय कळेना', असं म्हटलं त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार साताऱ्यात बोलताना म्हणाले, अनेकदा त्या आलेल्या आहेत. त्या बऱ्याच वेळी बाहेर आलेल्या आहेत. माझ्या प्रचारात त्या फारशा आल्या नाहीत. पूर्वी सुद्धा त्यांनी प्रचार केला आहे. माझ्या प्रचारात त्या फारशा पडायच्या नाहीत. पण, बाकी सगळ्यांना प्रचार त्यांनी केला आहे", असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.
मी काकींना विचारणार नातवाचा पुळका...
अजित पवार म्हणाले, 'मला तुम्ही 91 पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाताई कधी बाहेर आल्या आहेत का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी होती. त्यांनी वाटोळं केलं बारामतीचं, फार बाद झाला, याच्या हातात बारामती दिली तर वाट लावेल असं काही असतं तर गोष्ट वेगळी असती. मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तुम्हाला. आत्ता विचारण्याची वेळ नाही', असंही पुढे अजित पवार म्हणालेत.
नातवासाठी आजी मैदानात
नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी बारामतीतील पश्चिम भागाचा दौरा करत गाठीभेटी घेतल्या. लोकसभेच्या निवडणुकीत देखील प्रतिभा काकी यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातील काका पुतण्याची लढाई ही अत्यंत चुरशीची होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशातच प्रतिभा पवार देखील मैदानात उतरल्या आहेत. त्या ठिकठिकाणी जात लोकांना भेटत आहेत. यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. निवडणूक प्रचारासाठी अजित पवार गावभेट दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी त्यांच्या काकी प्रतिभा पवार यांचं नाव घेत विधान केलं आहे.
असलं प्रेम मला नको! - अजित पवार
आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीतील चार गावांच्या दौऱ्यावर असून पानसरेवाडी येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एक कार्यकर्ता अजित पवारांना म्हणाला की, काकींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. यावर अजित पवारांनी असलं प्रेम मला नको, असे उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.