सनी देओलला भाजपकडून उमेदवारी जाहीर, पंजाबच्या गुरदासपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासूनच सनी देओल भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची सध्या चर्चा सुरु झाली होती.
नवी मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सेलिब्रिटी उमेदवारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. भाजपने अभिनेते सनी देओल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
सनी देओल अपेक्षेप्रमाणे पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर किरण खेर चंडीगढ मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. गुरुदासपूर हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा पारंपरिक मतदारसंघ होता. 1997,1999, 2004 आणि 2014 मध्ये ते या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 2017 मध्ये विनोद खन्नांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुनील जाखड हे तब्बल 1,93,219 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडून ही सीट खेचून आणण्याचा भाजपचा मानस असेल.
आज (23 एप्रिल) सकाळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासूनच सनी देओल भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची सध्या चर्चा सुरु झाली होती.
26th list of BJP candidates for ensuing General Elections to the Parliamentary Constituency of Chandigarh and Punjab finalised by BJP CEC. pic.twitter.com/1LOv9Y2eVG— BJP (@BJP4India) April 23, 2019
हेमा मालिनी यांना मथुरेतून उमेदवारी
सनी देओल यांची सावत्र आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनीही मथुरेतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे विजेतेपदाची माळ दोघांच्याही गळ्यात पडली, तर चित्रपट विश्वातील मायलेक संसदेतही एकत्र झळकण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ठरेल.
सनी देओलची फिल्मी कारकिर्द
62 वर्षांचा सनी देओल 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून मुलगा करण देओलला लाँच करत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुराही त्याच्याच खांद्यावर आहे. त्याची भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यामुळे त्याचं प्रदर्शनही वारंवार लांबणीवर पडत होतं. भाईजी सुपरहिट, यमला पगला दिवाना, पोस्टर बॉईज, घायल वन्स अगेन हे त्याचे नजीकच्या काळातले चित्रपट.
सनीने 1983 साली बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर वर्दी, त्रिदेव, चालबाज, निगाहे यासारख्या चित्रपटातील त्याच्या अॅक्शन भूमिका अधिक गाजल्या. 1990 साली राजकुमार संतोषींच्या 'घायल' चित्रपटाने त्याला चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर दामिनी, डर, घातक, बॉर्डर, गदर एक प्रेमकथा यासारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या.