बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता, आमदार जयदत्त क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
सुरेश धस यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेलं राष्ट्रवादीचं हे दुसरं मोठं नाव आता शिवसेना -भाजपच्या गळाला लागण्याचे चिन्ह आहेत.
मुंबई : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल गुढीपाडव्याच्या दिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर हे देखील होते. सुमारे तासभर झालेल्या बैठकीनंतर महायुतीला पाठींबा देणार असल्याचं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. मात्र शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश कधी करणार याबाबत सोयीस्कर मौन बाळगलं. सुरेश धस यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेलं राष्ट्रवादीचं हे दुसरं मोठं नाव आता शिवसेना-भाजपच्या गळाला लागण्याची चिन्ह आहेत.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी 'मातोश्री'वर आलो होतो. उद्धव ठाकरे यांनीही मला पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मी पाडव्याला सगळ्यांना भेटतो. तसे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. आमचे मतभेद होते, पण मनभेद नाही, अशी प्रतिक्रिया जयदत्त क्षीरसागर यांनी भेटीनंतर दिली आहे.
शरद पवारांना भेटण्याबाबत बोलताना, भेट घेण्यासाठी ते इथे आहेत का माहित नाही. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभेचा किंवा पक्ष प्रवेशाचा विषय चर्चेत नव्हता. आम्ही महायुतीच्या उमेदवाराला उघड पाठींबा दिला आहे. आजची भेट छुपी नाही तर उघड भेट आहे, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
याआधी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं.
एकूणच राष्ट्रवादीविरोधात बंड करुन युतीच्या उमेदवाराला साथ आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट या सर्व जयदत्त क्षीरसागर लवकरच राष्ट्रवादीतून बाहेर पडतील हे जवळपास निश्चित झालं आहे आणि तशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.