सांगलीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला, गोपीचंद पडळकर लढणार निवडणूक
गोपीचंद पडळकर यांच्याआधी प्रकाश शेंडगे यांच्या नावाचाही वंचित आघाडीकडून विचार सुरु होता. मात्र गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आपण माघार घेण्यास तयार असल्याचं शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे.
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर आहेत. गोपीचंद पडळकर यांनी अपक्ष लढण्याची घोषणा करताच वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केली. अखेर आज ते वंचित आघाडीत प्रवेश करणार आहेत.
नागपूर येथे बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता सांगली लोकसभेसाठी गोपीचंद पडळकर वंचित आघाडीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं आहे.
सांगली लोकसभा मतदार संघात तिरंगी लढती होणार असल्याचं निश्चित झालं आहे. सांगली मतदार संघात भाजपाचे संजयकाका पाटील, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील आणि आता वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यात ही लढत असणार आहेत. त्यामुळे महायुती, आघाडी आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर सांगलीत पाहायला मिळणार आहे.
याआधी सांगलीतून वंचित बहुजन आघाडीने जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र जयसिंग शेंडगे यांचं वय पाहता, तसेच युती आणि आघाडीने दिलेले तरुण उमेदवार या सर्व गोष्टींचा विचार करुन पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पडळकर यांच्याआधी प्रकाश शेंडगे यांच्या नावाचाही वंचित आघाडीकडून विचार सुरु होता.
गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सांगली लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असतील तर मी माघार घेऊन त्यांना पाठिंबा देईन, असं म्हणत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही पडळकर यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं आहे.