Katewadi Gram Panchayat Election : काटेवाडीत अजित पवारांचं वर्चस्व, पण भाजपचा पहिल्यांदाच शिरकाव, किती जागा जिंकल्या?
बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडीत 16 पैकी 14 जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर भाजपने पहिल्यांदाच काटेवाडीत शिरकाव केला आहे. भाजपने काटेवाडीत 2 जागा जिंकल्या आहे.
Katewadi gram Panchayat Election Results : काटेवाडी, पुणे : बारामती (Baramati) तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत (Katewadi Gram Panchayat Election 2023) अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) घवघवीत यश प्राप्त झालं आहे. काटेवाडीत 16 पैकी 14 जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर भाजपनं (BJP) पहिल्यांदाच काटेवाडीत शिरकाव केला आहे. भाजपने काटेवाडीत 2 जागा जिंकल्या आहे.
काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गट पुन्हा बाजी मारणार की मतदार भाजपला संधी देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली होती. अखेर बहुप्रतिक्षित काटेवाडी ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. पवारांटं वर्चस्व असलेल्या काटेवाडीत यंदा भाजपचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळालं. काटेवाडीत पहिल्यांदाच भाजपनं दोन जागा जिंकल्या आहेत.
बारामातीतील काटेवाडीत अजित पवार विरुद्ध भाजप अशी लढाई होती. सत्तासंघर्षानंतर अजित पवारांच्या काटेवाडीत अजित पवारांचं वर्चस्व कायम राहतं का ?, याकडे सर्वाचं लक्ष होतं. मतदानावेळी अजित पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढा असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र अजित पवारांनी काटेवाडीत आपला दबदबा कायम ठेवत 14 जागेवर विजय खेचून आणला आहे.
पहिल्यांदाच भाजपचा विजय...
अजित पवार गटाला यंदा भाजपने तगडं आव्हान दिलं होतं. त्यामुळे भाजपने दोन जागेवर विजय मिळवत काटेवाडीत शिरकाव केला आहे. महत्वाचं म्हणजे वॉर्ड क्र. 5 आणि वॉर्ड क्र. 2 मध्ये एक भाजपचा आणि एक भाजपने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार जिंकला आहे. या दोन्ही वॉर्डमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आई आशा पवार यांनी मतदान केलं होतं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदानावेळी आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. यापूर्वी भाजपचा एकही उमेदवार काटेवाडीत निवडून आला नव्हता. त्यात काटेवाडीच दोन उमेदवारांनी बाजी मारली आहे आणि ही बाब भाजपसाठी महत्वाची आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक कोणत्या पक्षाच्या चिन्हावरुन निवडली जात नाही तर ही निवडणूक पॅनल आणि ग्रामस्थांच्या नाते संबंधावर निवडली जाते. मात्र या निवडणुकीला राजकीय किनार असते. त्यामुळे या निवडणुकीला मोठ्या निवडणुकीची लिटमस टेस्टदेखील म्हटलं जातं.