Bihar Election 2025: जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
Bihar Election 2025 : जीतनराम मांझी यांच्या पक्षाचे आमदार आणि उमेदवार अनिल कुमार निवडणूक प्रचारासाठी पोहोचले असता दिघौरा गावात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

Bihar Assembly Election : पाटणा : केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे टिकारी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि आमदार अनिल कुमार यांच्यावर दिघौरा गावात हल्ला करण्यात आला. अनिल कुमार यांच्या दाव्यानुसार दगडफेक झाली आणि गोळीबार देखील करण्यात आला. अनिल कुमार दिघौरा गावात निवडणुकीसंदर्भात प्रचार करण्यासाठी गेले होते. या घटनेत अनिल कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर त्यांचे काही सहकारी जखमी झाले.
या घटनेनंतर जखमी अनिल कुमार आणि त्यांच्या समर्थकांना टिकारी आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. टिकारी विधानसभा मतदारसंघात मऊ येथे बुधवारी उपेंद्र कुशवाह यांची प्रचार सभा झाली. या सभेनंतर अनिल कुमार यांचा प्रचार सुरु होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे.
आमदार अनिल कुमार यांच्यावरील हल्ल्यासंदर्भातील घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या मध्ये स्पष्ट दिसून येतं की अनिल कुमार जेव्हा प्रचारासाठी दिघौरा गावात पोहोचले तेव्हा काही लोकांनी त्यांची वाहनं अडवली. त्यानंतर विटा आणि दगडांनी हल्ला सुरु केला. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत वाहनं मागं घेतली.
हत्येचा कट होता: अनिल कुमार
दिघौरा गावातील हल्ल्यानंतर हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे उमेदवार अनिल कुमार यांनी यादव समाजाचे लोक आक्रमक झाले होते. थेट विटा-दगडांनी हल्ला सुरु केला. हा हत्येचा कट असल्याचा आरोप देखील अनिल कुमार यांनी केला. गोळीबार आणि दगडफेक करण्यात आली. यावेळी आमदार आहे की नाही कुणी पाहिलं नाही. वाहनांचं नुकसान केलं गेलं. सुरुवातीला 50-60 लोक होते, त्यानंतर ती संख्या 500 वर गेल्याचं अनिल कुमार म्हणाले.
अनिल कुमार याच मतदारसंघाचे आमदार असून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. दिघौरा गावात रस्ता आणि नाल्याचं काम न झाल्यानं गावकरी संतापले होते. त्यामुळं हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. बिहारमध्ये एनडीए आणि महागठबंधनमध्ये प्रमुख सामना आहे. एनडीएनं नितीशकुमारांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. दुसरीकडे महागठबंधननं राजदच्या तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलं आहे.





















