Manikrao Kokate : 28 वर्ष वनवास भोगला, मी कुणालाही अंगावर घेतो, पण दादांनी एक फोन केला अन्...; माणिकराव कोकाटेंची जोरदार फटकेबाजी
Manikrao Kokate : माझी कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. अजितदादांनी सकाळी सहा वाजता शपथ घेतल्यानंतर वेळेचं महत्व समजते, असेही माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
मालेगाव : अजितदादांनी दिलेला शब्द पाळला, मला 28 वर्ष वनवास करावा लागला. मी कुणालाही अंगावर घेतो पण दादांनी फोन करून सांगितले की, आता शांत घ्या, अशी जोरदार फटकेबाजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केली. लक्ष्मण तात्या नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मालेगाव, भारतीय डाळिंब बागायतदार संघ, मालेगाव तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशन यांच्या वतीने माणिकराव कोकाटे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमातून ते बोलत होते.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, माझी कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. अजितदादांनी सकाळी सहा वाजता शपथ घेतल्यानंतर वेळेचं महत्व समजते. माझी खोड आणि माझी झोप मोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ही जबाबदारी दिली, असे मिश्कील वक्तव्य त्यांनी केलं. कृषीमंत्री हे जबाबदारीचे पद आहे. कांद्याचे भाव गडगडले आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागले आहेत. दादांनी या विभागात मोठे काम केले आहे. आता मागे फिरणार नाही. दादा भुसे आणि माझे अनुभव यातून धोरणात्मक बदल करावा लागेल. निर्यात शुल्क संदर्भातील निर्णय हा केंद्र सरकारचा आहे तरी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी म्हटले.
जास्त कडक बोलणारा माणूस म्हणून माझी ओळख
शेतकरी एका वर्षी खड्ड्यात गेला तर तो वर येत नाही. त्यामुळे काही शेतकरी आणि ठेवीदारांना सवलत देऊन जिल्हा बँक कशी उभी राहील यासाठी काम करावे लागेल. मी हाडाचा शेतकरी आहे, तरी विविध पदावर काम करीत असताना अनेक कटू अनुभव आहेत. जास्त कडक बोलणारा माणूस म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. माझ्या स्वभावात देखील मी बदल करणार आहे.
सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहिजे
माझी बँकेच्या निमित्ताने वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. सत्तेमागे लोक येत असतात. मला ताफ्याची गरज नाही, सायरन वाजायचे नाहीत असे मी माझ्या विभागाला पहिल्याच दिवशी सांगितले. माझ्याकडे सिक्युरीटी नाही, मला त्याची गरज नाही. आत्ताच्या काळात पुढे-पुढे करणाऱ्यांची संख्या जास्त वाढली. आता जाती-धर्माच्या नावावर राजकारण व्हायला लागले पूर्वी असे होत नव्हते. अनेक राजकारणी जातीचा आणि धर्माचा आधार घेतात, हे निवडणुकीच्या वेळेतच का होते ते कळत नाही. आगमी काळात सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहिजे, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.
मी कुणालाही अंगावर घेतो पण...
दादांनी दिलेला शब्द पाळला, मला 28 वर्ष वनवास करावा लागला. मी कुणालाही अंगावर घेतो पण दादांनी फोन करून सांगितले की, आता शांत घ्या. 48 कोटी रुपये शेतकऱ्यांची फसवणूक झाली. शेतकरी फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पोलिसांना आदेश केलेत. शिवार खरेदीत फसवणूक जास्त झालेल्या आहेत. आधारभूत किंमत शेतकऱ्यांच्या मालाला मिळावी, यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. मी पारदर्शक काम करणार असून केंद्रीय कृषिमंत्र्यांची लवकर भेट घेणार आहे. मला सर्वात चांगले काम कसे करता येतील याची मी काळजी घेणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
नरहरी झिरवाळांना टोला
विद्यार्थ्यांना चागले शिकणं मिळालं पाहिजे, इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थी जाणार नाही यासाठी प्रयत्न करू. आमचा झिरवाळ सर्वाकडे हात ठेवतो. सर्वांना असे वाटते की ती तो आपलाच आहे, असे म्हणत त्यांनी नरहरी झिरवाळ यांना टोला लगावला. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याच जिल्ह्याला मिळणार आहे. इतर जिल्ह्याला पालकमंत्रीपद देऊ नये, ते आम्हाला चालणार नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री चांगले काम करू शकेल, असेही माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.
आणखी वाचा