नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, भाजपच्या बड्या नेत्याच्या नाराजीमुळे राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे.
नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिक महापालिकेचे आयुक्त (Nashik Municipal Corporation Commissioner) डॉ. अशोक करंजकर (Dr. Ashok Karanjkar) यांची बदली होणार असल्याच्या चर्चा शहरात जोरदार सुरु होत्या. अखेर दोन दिवसांपूर्वी यावर शिक्कामोर्तब झाले. नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आयुक्तपदी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Rahul kardile) यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता भाजपच्या बड्या नेत्याच्या नाराजीमुळे राहुल कर्डिले (Rahul Kardile) यांच्या नियुक्तीला ब्रेक लागल्याची चर्चा रंगली आहे.
नाशिक महापालिकेला गेल्या सहा वर्षात तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळाला नाही. त्याचा थेट परिणाम नाशिकच्या विकासावर झाला आहे. डॉ. अशोक करंजकर यांनीही राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पालिकेच्या कारभारातून अंग काढून घेतल्याचे दिसून आले. त्यात दोन निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आणि पालिकेतील प्रशासकीय राजवटीमुळे कारभार पूर्णपणे भरकटल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिकसाठी आयएएस अधिकारी द्यावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे महायुतीचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे नाशिक आयुक्तपदाची धुरा सोपवली. मात्र, भाजपच्या बड्या नेत्याने आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची गळ घातल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्याचे ऐकण्याचा निर्णय घेतल्यास नाशिक महानगर विकास प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्याकडे महापालिकेचा तात्पुरता पदभार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक मनपा आयुक्तपदाचा कार्यभार कोण स्वीकारणार?
दरम्यान, भाजपचे संबंधित मंत्री हे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. आगामी सिंहस्थासाठी नाशिकवरील आपली कमांड अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना आपल्या मर्जीतील अधिकारी हवा असल्याची चर्चा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी कर्डिले यांची नियुक्ती केल्याने मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक लागणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे कर्डिले मसुरी येथे ट्रेनिंगसाठी उपस्थित आहेत. त्यामुळे आता नाशिक मनपा आयुक्तपदाचा कार्यभार कोण आणि कधी हाती घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या