Harshwardhan Jadhav : भाजपने माझं घर फोडलं, बायकोला विरोधात उभं केल्यानंतर हर्षवर्धन जाधवांचा संताप
Harshwardhan Jadhav on BJP : संजना जाधव यांना कन्नडमधून उमेदवारी देण्यात आल्यानंतर हर्षवर्धन जाधव चांगलेच संतापले आहेत.
Harshwardhan Jadhav on BJP : कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव मैदानात उतरल्या आहेत. भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. दरम्यान, बायको विरोधात उभारल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.
हर्षवर्धन जाधव काय काय म्हणाले?
हर्षवर्धन जाधव म्हणाले, आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिलं. कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठिमागे रावसाहेब दानवे आहेत. माझं घर फोडलं. माझ्या विरोधात साक्षात माझी पत्नी उभी करण्याचं काम झालं, याचा मी जाहीर निषेध करतो. दिवाळी दोन दिवसांवरती आलेली आहे. सर्वजण आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणच उरलं नाही. मी आणि माझी आई दोघेचं उरलेलो आहोत. ठोकून काढू शेवटी धर्मयुद्ध आहे.
संजना जाधव अन् हर्षवर्धन जाधव आमने सामने
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, याच मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर शिंदे गटाने त्यांच्या पत्नी संजना जाधव यांना उमेदवारी दिल्याने हर्षवर्धन जाधव संतापले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळं या मतदारसंघात पती पत्नी आमने सामने येताना पाहायला मिळणार आहेत. याशिवाय कन्नड मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उदयसिंह राजपूत विद्यमान आमदार आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.
उदयसिंह राजपूत एकनिष्ठ राहिले असल्याने त्यांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव विरुद्ध संजना जाधव विरुद्ध उदयसिंह राजपूत अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या