Eknath Shinde Candidate list 2024 : विखे-थोरात वादाने राजकारण पेटलं, पण उमेदवार जाहीर करत शिंदे गटाने संगमनेरचं मैदान मारलं!
Eknath Shinde Candidate list 2024 : संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून उमेदवार मैदानात उतरवण्यात आला आहे.
Eknath Shinde Candidate list 2024 : संगमनेर (Sangmner) हा अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून शिंदेंचा उमेदवार या मतदारसंघात लढत देणार आहे. शिंदे गटाकडून (Shinde Group) विधानसभेसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेमधून अमोल धोंडीबा खताळ यांना रिंगणात उतरवलं आहे. या मतदारसंघासाठी सुजय विखे (Sujay Vikhe Patil) इच्छुक होते. पण आता ही जागा शिंदें गटाच्या वाट्याला गेली आहे.
दक्षिण नगरच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंच्या वाट्याला पराभव आला होता. लोकसभेला त्यांच्याविरोधात निलेश लंके मैदानात होते. शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी निवडणूक जिंकलीही. त्यामुळे सुजय विखे पुन्हा एकदा विधानसभेसाठी तयारी करत होते. पण ही जागा आता शिंदे गट लढवणार आहे.
जयश्री थोरातांवरील टीकेनंतर राजकारण पेटलं
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.याचसभेमध्ये सुजय विखे व्यासपीठावर असताना वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर संगमनेरचं वातावरण चांगलच पेटलं. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानेही याची दखल घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळातही विरोधकांकडून याचा कडाडून विरोध करण्यात आला.
काँग्रेसकडून बाळासाहेबत थोरातच मैदानात
दरम्यान संगमनेरच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांचं एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे यंदाच्याही विधानसभा निवडणुकासांठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांचा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. पण या मतदारसंघासाठी सुजय विखे महायुतीकडून इच्छुक होते. आता शिंदे गटाचा उमेदवार बाळासाहेब थोरातांच्या विरोधात मैदानात आहे. त्यामुळे संगमनेरकर कुणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून 1985 पासून 2019 पर्यंत असे सलग आठ वेळा निवडून आले आहेत. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 25 हजार 380 हजार मते मिळाली होती. तर साहेबराव नवले यांना 63128 मते मिळाली होती.