Maharashtra Vidhansabha Election 2024: पुढील दोन दिवसांत मोठी घडामोड घडणार?; मनसेसोबतच्या युतीवर शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाने खळबळ
Maharashtra Vidhansabha Election 2024: दीपक केसरकर यांनी राजन तेली यांच्यावर देखील टीका केली आहे.
Deepak Kesarkar On MNS: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election 2024) जाहीर झाल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आज शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सात उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला असून राज्यातील जवळपास सर्वंच जागांवर उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आता काही जागांवर महायुतीकडून मनसेला पाठिंबा दिला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची एका हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. याचदरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. मनसे आमच्यासोबत असावी, अशी सर्वांची इच्छा होती. लोकसभेला देखील मनसे आमच्या सोबत होती. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसात काहीतरी घडेल अशी अपेक्षा आहे, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. दीपक केसरकर यांच्या या विधानामुळे आगामी दोन दिवसांत मोठी राजकीय घडामोड घडणार की काय?, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
दीपक केसरकरांचा राजन तेलींवर घणाघात-
माझ्याशी लढा देऊन दोन वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी स्वतःला कोणीतरी मोठा असल्याचा भास केला जातोय. राणेंमुळे आमदार झालेल्या माणसाने राणेंचा वापर करून आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात. नारायण राणे यांच्या मागे नसते तर आमदार हे पद मागे लागलं नसतं. राजन तेली यांच्यामध्ये हिवस्त्र प्रवृत्ती आहे, त्यामुळे ते काही महिने जेलमध्ये होते, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. राजन तेलींनी आजपर्यत कुणाला हरवल्याचा पुरावा नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हरले, त्यांना बाळा भिसे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने सत्याविजय भिसे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या प्रकरणात राजन तेली हे काही महिने जेलमध्ये होते. पण पुराव्या अभावी सुटका झाली. मात्र हा काही पहिला पराक्रम नाही, असा घणाघात देखील दीपक केसरकर यांनी केला. राजन तेली यांची कायम पराभवाची परंपरा राहिलेली आहे. ते सावंतवाडीचे नसून देखील सावंतवाडीत येऊन निवडणूक लढले. पराभव झाल्यानंतर ते माझ्यावर टीका करतात. आता राजन तेली यांची पराभवाची हॅट्रिक होईल, असा दावा देखील दीपक केसरकर यांनी केला आहे.