पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देश सुरक्षित नाही, शरद पवारांचा घणाघात
ना खाउंगा ना खाने दुगा म्हणणाऱ्या मोदींनी अनिल अंबानींच्या रिलायन्ससाठी 350 कोटींचे विमान 1660 कोटींना विकत घेण्याचं काम केलं. मोदींनी देशाच्या कंपनीऐवजी अंबानीच्या कंपनीला राफेलचं कंत्राट दिलं, असा आरोप शरद पवारांनी यावेळी केला.
परभणी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकार आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींवर निशाण साधला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, नोटबंदी, जीएसटी, राफेल अशा विविध मुद्द्यांवर शरद पवारांनी मोदींना आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. मोदींच्या हाती देश सुरक्षित नाही अशी टीका पवारांंनी केली. परभणीतील प्रचार सभेत शरद पवार बोलत होते.
मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली नाहीत. युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं. मात्र देशातील बेरोजगार तरुणांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवायचा असेल तर युवकांनी लढा दिला पाहिजे, असं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं.
मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं
मोदी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावरही पवारांनी टीकास्त्र सोडलं. बळीराजाला संकटात टाकण्याचे काम सरकारने केले. आमच्या काळात शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू आम्ही पुसले होते. आम्ही शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मिमिक्री करत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
VIDEO | महाआघाडीच्या सभेत शरद पवारांचा 56 इंचाच्या छातीवर निशाणा | कराड, सातारा | एबीपी माझा
शेतमालाला योग्य भाव देण्याचं आश्वासनही भाजप सरकारने दिलं होतं. मात्र ना शेतमालाचे भाव वाढवले ना कर्जमाफ केले. आज दुष्काळ गंभीर आहे तरीही पाणी नाही, चारा छावण्या नाहीत. शेतकऱ्यांना दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आम्ही सत्तेवर बसू देणार नाही. सरकारची हकालपट्टी आम्ही करु, असा निर्धार शरद पवारांनी यावेळी केला.
नोटबंदीनंतर 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या
नोटबंदी, जीएसटीने सामान्यांसह व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. नोटबंदीनंतर परत आणलेला काळा पैसा तर कुठे जिरला हे मोदींनाच माहित आहे. नोटबंदीनंतर 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हे कर्तृत्व भाजप सरकारचं आहे, अशी टीका करत सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या सरकारला खाली खेचा असं पवारांनी म्हटलं.
मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही
ना खाउंगा ना खाने दुगा म्हणणाऱ्या मोदींनी अनिल अंबानींच्या रिलायन्ससाठी 350 कोटींचे विमान 1660 कोटींना विकत घेण्याचं काम केलं. मोदींनी देशाच्या कंपनीऐवजी अंबानीच्या कंपनीला राफेलचं कंत्राट दिलं. ज्यांनी कधी खेळण्यातलं विमान बनवलं नाही, त्यांना राफेलचं कंत्राट दिलं कसं, असा सवाल पवारांनी यावेळी विचारला. तसेच याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही. राफेलची चौकशी झाली तर सगळे जेलमध्ये जातील, म्हणून हे सर्व गुप्त ठेवलं जात आहे, असा आरोप शरद पवारांनी यावेळी केला.
देशाच्या जवानांवर हल्ला केला गेला तेव्हा देश आपल्या सैनिकांच्या पाठीमागे उभा राहिला. कुणीही राजकारण केलं नाही, मात्र मोदींनीच याचं राजकारण केलं. अभिनंदन यांची सुटका जगाच्या दबावाने झाली. मात्र 56 इंच छाती वाल्यानी अभिनंदन यांना परत आणले, असं भाजपवाले सांगत आहेत. मड्यावरचं लोणी खायचं काम हे सरकार करतंय, असा आरोप पवारांनी केला.