एक्स्प्लोर
Advertisement
चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनवणे यांना विजयासाठी करावा लागणार संघर्ष
चोपडा हा जळगाव जिल्ह्यातील एक मतदारसंघ. जळगावसह संपूर्ण खानदेश तसा भाजपाचा बालेकिल्ला असला तरी चोपडा मतदारसंघ त्याला अपवाद आहे. 2014 च्या निवडणुकीत इथे भाजपचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी तब्बल चारवेळा प्रतिनिधीत्व केलेला हा मतदारसंघ आहे.
चोपडा विधानसभा मतदारसंघातून २०१४ साली शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे विजयी झाले होते. चोपडा विधानसभा मतदारसंघात आदिवासी, कोळी, तडवी समाज प्रामुख्याने असून या समाजाची विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका राहिली आहे. येथे शेतकरी, शेत मजूर आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेसाठी रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतो. चोपडा विधानसभा मतदारसंघ मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील काही भाग म्हणजे किनगाव, साकली सर्कलचा परिसर या मतदारसंघात येतो. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव झाला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अरुणभाई गुजराती यांनी तब्बल चार वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. हल्ली ते सक्रिय राजकारणात दिसत नाहीत.
विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे वारे या मतदारसंघात वाहू लागले आहेत. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं प्राबल्य आहे. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप सोनवणे हे राष्ट्रवादीचे वजनदार नेते या मतदारसंघात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार माधुरी किशोर पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. यावेळी देखील माधुरी पाटील या इच्छुक असून त्यांना पक्ष तिकीट देईल काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तसंच येथे राष्ट्रवादी पक्षाला सहाय्य करणारा सर्वपक्षीय गट देखील आहे. २००९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर जगदीशचंद्र वळवी हे निवडून आले होते. त्यानंतर ते भाजपात गेले. २०१४ साली त्यांनी भाजपातर्फे निवडणूक लढवली, पण ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. जगदीशचंद्र वळवी आता राष्टवादी कॉंग्रेस पक्षात असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या नावासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधी पक्षातील काही नेत्यांचाही आग्रह असल्याची चर्चा आहे. हे नेते जगदीशचंद्र वळवी यांना विजयी करण्यासाठी कंबर कसून तयार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची माहिती आहे.
विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे हे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांचे कार्यकर्त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. मात्र त्यांना स्थानिक शिवसेना नेते आणि शिवसैनिकांची हवी तशी साथ यावेळी मिळेल असं चित्र दिसून येत नाही. जातीय समीकरणं लक्षात घेता त्याचाही फटका काही अंशी प्रा. सोनवणे यांना या विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे.
प्रा. सोनवणे त्यांच्या पाच वर्षातील कामाच्या जोरावर या ठिकाणी प्रचार करीत असले तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताकदीपुढे आणि स्वपक्षातील नाराज नेत्यांमुळे यावेळी आ.चंद्रकांत सोनवणे यांची विजयाची वाट काहीशी बिकट दिसत आहे. त्यांना विजयासाठी बराच संघर्ष करावा लागणार आहे. येथे शिवसेनेच्या नेत्या इंदिराताई पाटील आणि माजी आमदार कैलास पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
भाजपची स्थिती येथे मध्यम आहे. युती झाली नाही तर प्रभाकर सोनवणे, गोविंद सैंदाणे ही नावे चर्चेत आहेत. या उमेदवारांनी तयारी देखील केली असून भाजपाच्या प्रचारासाठी ते मतदारसंघात फिरत आहेत. मागील २०१४ सालच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत बारेला यांनी २४ हजारपेक्षा मते घेऊन जोरदार लढत दिली होती. याही वेळी ते उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरु केलेल्या आहेत. त्यांना गावोगावी प्रतिसादही मिळत असल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांना ते यंदाही डोकेदुखी ठरू शकतात अशी चर्चा आहे. चंद्रकांत बारेला यांनी स्वतःची अशी एक वोट बँक बांधून ठेवली असल्याचेही येथील मतदारांकडून सांगितलं जातंय.
कॉंग्रेसकडून २०१४ साली ज्ञानेश्वर रायसिंग भादले हे रिंगणात होते. त्यांनीही १० हजार मते घेऊन कॉंग्रेस पक्षाची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीमध्ये लढण्याची चिन्हे असून कॉंग्रेसचीही ताकद राष्ट्रवादीला मिळेल असं बोललं जात आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून देखील विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. अरुणा संजीव बावीस्कर या मतदारसंघात इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे मुलाखतदेखील दिल्याची माहिती आहे. त्यांनीदेखील कार्यकर्त्यांमार्फत प्रचार सुरु केल्याने त्यांच्यामुळे प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या मतांच्या संख्येवर परिणाम होवू शकतो असे येथील जाणकार सांगतात.
थोडक्यात या वेळी चोपडा हा मतदारसंघ कोणाला विजयी करेल याचं खात्रीलायक उत्तर चोपड्याचे मतदार वगळता कुणाकडेच नाही. प्रा.चंद्रकांत सोनवणे, जगदीशचंद्र वळवी, चंद्रकांत बारेला यांच्यातच विजयासाठी खरा संघर्ष होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. शिवसेना-भाजप यांची युती झाली नाही तर भाजपचा कोणता उमेदवार येथे असेल हे सर्वस्वी गिरीश महाजन यांच्यावरच अवलंबून असणार आहे.
चंद्रकांत सोनवणे (शिवसेना) – ५४१७६
माधुरी पाटील (राष्ट्रवादी) – ४२२४१
जगदीशचंद्र वळवी (भाजपा) – ३०५५९
चंद्रकांत बारेला (अपक्ष) – २४,५०६
ज्ञानेश्वर रायसिंग भादले (कॉंग्रेस) – १०२८०
प्रा.चंद्रकांत सोनवणे ११९३५ मतांनी विजयी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement