Eknath Shinde: मोठी बातमी : महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे मूळगावी जाणार, महायुतीत मोठ्या घडामोडी
Mayauti Meeting Cancle Eknath Shinde: महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
Mayauti Meeting Cancle Eknath Shinde मुंबई: सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे गावी जाणार-
महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार होती. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. परंतु महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंचा पडलेला चेहरा चर्चेचा विषय-
काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा झाली होती. यावेळी झालेल्या फोटोसेशनवेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली चर्चेचा विषय ठरली होती. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढताना एकनाथ शिंदे यांचे खांदे पडलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह दिसत नव्हता. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांचा पडलेला चेहरा दिल्लीतील राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल,तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?
राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारावं अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना घातल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंची ठाण्यातली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याचं समजतं. काल दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंची शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत बैठक झाली. आपण सत्तेत राहूनच सरकार चालवावं असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीत आळवला. त्यामुळं एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.