(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra New CM: ठरलं! मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; दिल्लीत मोठा निर्णय, अमित शाह एकनाथ शिंदेंना म्हणाले...
Devendra Fadnavis Maharashtra New CM: आता कालच्या बैठकीनंतर सत्तास्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईत रंगणार आहे.
Devendra Fadnavis Maharashtra CM: सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या बैठकीला उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणविसांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
आता कालच्या बैठकीनंतर सत्तास्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईत रंगणार आहे. महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात निरीक्षक येणार आहेत. त्यानंतर शपथविधी कधी होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती समोर येत आहे.
अमित शाह एकनाथ शिंदेंना काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, असं अमित शाह यांनी सांगितले. मात्र एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय कळवला नाही, अशी सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे. आज मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंनी बैठकीत काय मागणी केली?
एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली. त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेंना देणार का?, हे आगामी दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.